अडखळ येथील जुईकर मोहल्ल्यात चोरी; १६ हजार रुपये रोख रकमेसह सोन्याचे दागिने गायब
दापोली | प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अडखळ येथील जुईकर मोहल्ला परिसरात घरातील लाकडी बेडच्या कप्प्यात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत एकूण १ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे.
याप्रकरणी फैरोजा अब्दुल रहिम वाकणकर (वय ५७, रा. अडखळ, जुईकर मोहल्ला, ता. दापोली) यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी १० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या राहत्या घरात घडली. फिर्यादी यांनी बेडरूममधील लाकडी बेडच्या कप्प्यात सोन्याचे विविध दागिने आणि रोख रक्कम ठेवली होती. काही कालावधीनंतर तपासणी केली असता दागिने आणि रोकड जागेवर आढळून आली नाही. अज्ञात व्यक्तीने बेडचा कप्पा उघडून कोणतीही संमती न घेता ही चोरी केल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.
या चोरीमध्ये १६ हजार रुपये रोख रक्कम, ३ ग्रॅम वजनाची लहान मुलांची सोन्याची चैन, ४ ग्रॅम वजनाचा सोन्याचा कानातील जोड, ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दोन जोड, ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दोन जोड, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, लहान मुलींच्या मापाच्या सहा सोन्याच्या अंगठ्या, प्रत्येकी १ ग्रॅम वजनाची तीन सोन्याची बिस्किटे आणि ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पान असा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ६६ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त होत असून, दापोली पोलीस पुढील तपास करीत आहेत.








