भगूर येथील उड्डाणपुलालगत अनधिकृत कचराडेपोचा प्रश्न ऐरणीवर; परिसराची पाहणी करून प्रशासनाला उपाययोजनांचे आवाहन
भगूर | प्रतिनिधी
“दुर्गंधी नको, स्वच्छ हवा हवी!” अशी ठाम मागणी करत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने भगूर येथील उड्डाणपुलालगत साचणाऱ्या दुर्गंधीयुक्त कचऱ्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मभूमी असलेल्या भगूर गावालगत उड्डाणपुलाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला मोठ्या प्रमाणात सडलेला कचरा तसेच मृत जनावरे टाकली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. हा कचरा तातडीने आणि कायमस्वरूपी हटविण्याची मागणी राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भागवत यांनी केली.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील काही हॉटेल्स, हॉस्पिटल, चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्या, मांस-मच्छी विक्रेते तसेच काही रहिवाशांकडून वारंवार या परिसरात कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कचऱ्याचे ढीग सातत्याने साचत असल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या पुढाकाराने नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत, शिवसेना नेते कैलास गायकवाड, सेवानिवृत्त नामदेव कस्तुरे सर, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पदाधिकारी संजय बलकवडे, जगन पवार, बलराम वाघमारे, उद्योजक नंदूजी लाहोटी, किशोर भवार, बाळासाहेब साळवे, सतीश भगत, अशोक सदावर्ते, श्यामआप्पा डावरे, विशाल पवार, विजय गांगुर्डे आणि अनिल कटारे यांनी संबंधित परिसराची पाहणी केली. यावेळी नव्याने तयार होत असलेल्या अनधिकृत कचराडेपोला प्राथमिक स्वरूपात आक्षेप नोंदविण्यात आला.
या समस्येबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. परिसरातील कचऱ्याचे फोटो देवलाली कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि भगूर नगरपरिषद यांनाही पाठविण्यात आले होते. मात्र, अद्याप कायमस्वरूपी तोडगा निघाला नसल्याने ज्येष्ठ नागरिकांनी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या जिल्हाध्यक्षांकडे तक्रार केली. त्यानंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांसह प्रत्यक्ष परिसराची पाहणी केली.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने देवलाली कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि भगूर नगरपरिषद या दोन्ही प्रशासनांना काही उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याबाबत सूचना फलक लावणे, अस्वच्छतेमुळे उद्भवणाऱ्या रोगराईला आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे आणि सुरुवातीच्या काळात या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाचे प्रतिनिधी नियुक्त करणे, अशा मागण्यांचा समावेश आहे.
या कामासाठी वरिष्ठ प्रशासनाची आवश्यक परवानगी घेऊन तातडीने कार्यवाही करावी, तसेच स्थानिक प्रशासनाला आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहनही समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ नुसार कचऱ्याचे योग्य संकलन, वर्गीकरण आणि शास्त्रोक्त व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. उघड्यावर अनधिकृतपणे कचरा टाकण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने प्रभावी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
“आमचा परिसर, आमचा हक्क! दुर्गंधी नको, स्वच्छ हवा हवी!” या भूमिकेतून नागरिकांनी परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी एकत्रितपणे पुढाकार घेतला आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कचऱ्याची समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.










