‘समान काम, समान वेतन’सह प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन; बीड जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा नसरीन बागवान यांचे शासनाला मागण्या मान्य करण्याचे आवाहन
केज | प्रतिनिधी
‘समान काम, समान वेतन’ या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी केज आणि अंबाजोगाई येथील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या बीड जिल्हा महिला आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती नसरीन बागवान यांनी यासंदर्भात अधिकृत पत्रक प्रसिद्ध करून आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी केज आणि अंबाजोगाई येथे न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असून, त्यांच्या न्याय्य मागण्यांना महिला आघाडीने सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे.
सध्याच्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील नोकरदार, व्यावसायिक, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना आंदोलन व उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे, ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे नसरीन बागवान यांनी पत्रकात नमूद केले आहे.
न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची शासनाने तातडीने दखल घेऊन त्या मान्य कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, नसरीन बागवान यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन न्यायालयीन कर्मचारी तसेच महिला कर्मचाऱ्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यांच्या अडचणी जाणून घेत शासनाने या आंदोलनाची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.










