कल्याण, डोंबिवली आणि शिळफाटा येथे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर; सकाळी मेढ्यातून तर रात्री विठ्ठलवाडीतून बस सुटणार
प्रतिनिधी :
मेढा एसटी बस आगाराच्या वतीने जावळी तालुक्यातील तसेच विठ्ठलवाडी, कल्याण परिसरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन ‘मेढा-विठ्ठलवाडी-कल्याण’ ही नवीन एसटी बसफेरी सुरू करण्यात आली आहे. या बससेवेमुळे कल्याण, डोंबिवली आणि शिळफाटा परिसरात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना यापूर्वी कल्याण, डोंबिवली आणि शिळफाटा येथे जाण्यासाठी मुंबई सेंट्रल किंवा दादर येथे उतरून पुढील प्रवास करावा लागत होता. त्यामुळे या भागात राहणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत होती. ही अडचण लक्षात घेऊन मेढा आगाराने थेट विठ्ठलवाडी-कल्याणपर्यंत एसटी सेवा सुरू केली आहे.
नवीन बसफेरीला सध्या प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, या सेवेमुळे प्रवाशांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण आहे.
मेढा येथून सकाळी १० वाजता बस सुटणार असून, सातारा, कात्रज बायपास, एक्स्प्रेस हायवे, कळंबोली, नेरूळ, वाशी, कोपरखैरणे, शिळफाटा, कल्याण आणि डोंबिवलीमार्गे विठ्ठलवाडी येथे पोहोचणार आहे.
विठ्ठलवाडी येथून रात्री १० वाजता परतीची बस सुटणार आहे. ही बस कल्याण, डोंबिवली, शिळफाटा, कोपरखैरणे, वाशी, नेरूळ, कळंबोली, एक्स्प्रेस हायवे आणि कात्रज बायपासमार्गे सातारा होत मेढा येथे पोहोचणार आहे.
नवीन एसटी बससेवेमुळे जावळी तालुक्यातील नागरिकांसह मुंबई उपनगरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थेट वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. ही सेवा प्रवाशांसाठी सोयीची ठरत असून, प्रवाशांकडून या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.










