वारंवार वीज खंडित होण्याने दैनंदिन कामकाज ठप्प; विद्युत मोटारी जळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
लोणी काळभोर | प्रतिनिधी :
लोणी काळभोर आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून, कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. दिवसातून अनेक वेळा कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित होत असल्याने दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे.
सध्या परिसरातील शेतीच्या कामांना वेग आला असून, पिकांना पाणी देण्यासाठी विजेची नितांत गरज आहे. मात्र, वीजपुरवठा अनियमित आणि कमी दाबाने होत असल्याने विद्युत पंप चालविणे कठीण झाले आहे. कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे काही शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी जळाल्याच्या घटनाही घडल्या असून, त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
दुसरीकडे, लोणी काळभोर बाजारपेठ तसेच महामार्गालगतच्या छोट्या व्यावसायिकांनाही या समस्येचा फटका बसत आहे. गिरणीचालक, वेल्डिंग व्यावसायिक आणि संगणकावर आधारित काम करणाऱ्या व्यावसायिकांचे काम वीजपुरवठा खंडित झाल्याने ठप्प होत आहे. तासन्तास वीज नसल्यामुळे त्यांच्या व्यवसायातील आर्थिक उलाढाल मंदावली आहे.
वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित आणि कमी दाबाची समस्या यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी तांत्रिक बिघाड तातडीने दुरुस्त करून पूर्ण दाबाने आणि अखंडित वीजपुरवठा सुरू करावा, अशी जोरदार मागणी लोणी काळभोर परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांकडून होत आहे.










