जिल्हा बँकेच्या शिष्टमंडळाचा गोवा अभ्यास दौरा; आगामी हंगामात ५ हजार मेट्रिक टन काजू बी खरेदीचे उद्दिष्ट
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या काजू, सुपारी, आंबा, नारळ, गावठी अंडी आणि भाजीपाला आदी शेतीमालाला योग्य व स्थिर दर मिळावा, तसेच सहकाराच्या माध्यमातून हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने फोंडा (गोवा) येथील ‘गोवा बागायतदार सहकारी खरेदी-विक्री संस्था मर्यादित’ला भेट दिली. या दौऱ्यात संस्थेच्या कार्यपद्धतीची पाहणी करून विविध बाबींची माहिती घेण्यात आली.
या अभ्यास दौऱ्यात जिल्हा बँकेचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, काजू प्रक्रिया उद्योजक, काजू तज्ज्ञ आणि प्रगतशील शेतकरी सहभागी झाले होते. शिष्टमंडळाने गोवा बागायतदार संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र सावईकर, उपाध्यक्ष जितेंद्र पाटील आणि कार्यकारी संचालक जितेंद्र भिडे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. संस्थेची खरेदी-विक्री, प्रतवारी, प्रक्रिया, पॅकिंग, ब्रँडिंग आणि विपणन व्यवस्था समजून घेतली. तसेच संस्थेच्या ॲग्रो प्रोसेसिंग युनिटलाही प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली.
गोवा बागायतदार संस्थेने स्वतःची स्वतंत्र बाजारपेठ निर्माण करून ग्राहकांच्या मनात विश्वासाचे स्थान मिळवले आहे. याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्पादित शेतीमालालाही मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील काजू विक्री संघ, सहकारी संस्था, बँका आणि बाजार समित्यांना एकत्र आणून तालुकास्तरावर खरेदी केंद्रे उभारण्याचा, तसेच जिल्हास्तरावर मध्यवर्ती यंत्रणा विकसित करण्याचा विचार या दौऱ्यात मांडण्यात आला.
सहकारी संस्थांच्या माध्यमातून काजू आणि सुपारीची प्रतवारी करून दर्जानुसार दर निश्चित केले जाणार आहेत. आगामी हंगामापासून जिल्ह्यात किमान ५ हजार मेट्रिक टन काजू बी खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सुपारीसाठीही स्वतंत्र धोरण आखण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योग आणि ब्रँडिंगला चालना देऊन विक्रीतून मिळणारा नफा व लाभांश थेट शेतकऱ्यांना देण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.
या अभ्यास दौऱ्यात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे संचालक गजानन गावडे, रवींद्र मडगांवकर, गणपत देसाई, विद्याधर परब, तुळशीदास रावराणे, अशोक सारंग, सुनील उकिडवे, दीपक ठाकूर, अमित आवटी, निलेश पवार, विलास ठाकूर, योगेश वालावलकर, चंद्रशेखर देसाई, डॉ. प्रसाद देवधर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांच्यासह सहकार क्षेत्रातील मान्यवर आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










