आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळला; पाळणे, मनोरंजनाची साधने आणि दुकाने सज्ज
आमळी (ता. साक्री) : साक्री तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तीर्थक्षेत्र कन्हैयालाल महाराज मंदिर, आमळी येथील वार्षिक यात्रोत्सवाला शनिवार, दि. २१ नोव्हेंबरपासून भक्तिमय आणि उत्साही वातावरणात प्रारंभ होत आहे. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे.
यात्रोत्सवासाठी मंदिराची विशेष सजावट करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी रंगीबेरंगी विद्युत रोषणाईमुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. भाविकांसह लहान मुलांच्या मनोरंजनासाठी मोठे आकाशपाळणे, विविध खेळणी आणि मनोरंजनाची साधने दाखल झाली आहेत. तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल, मिठाईची दुकाने, पूजासाहित्य आणि विविध वस्तूंची दुकाने थाटण्यात आल्याने यात्रेची बाजारपेठ सज्ज झाली आहे.
आमळी येथील हे जागृत देवस्थान असल्याने यात्रेला साक्री तालुक्यासह संपूर्ण धुळे जिल्हा आणि लगतच्या भागांतून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. यात्रेच्या निमित्ताने नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांची मोठी रेलचेल पाहायला मिळते. धार्मिक श्रद्धा, परंपरा आणि ग्रामीण संस्कृतीचा अनोखा संगम असलेला हा यात्रोत्सव भाविकांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे.
यात्रेदरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर परिसरातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्थेकडे संबंधित यंत्रणांनी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. तसेच पाळणे व मनोरंजनाच्या साधनांची सुरक्षितता तपासूनच ती सुरू ठेवावीत, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.










