चाळीस वर्षांच्या पत्रकारितेचा अनुभव; शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल
शहादा, दि. २० : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विचार विभागाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी शहादा येथील ज्येष्ठ पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ तथा सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय पितांबर वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय काँग्रेस विचार विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण डावर यांच्या मान्यतेने आणि विचार विभागाचे प्रदेशाध्यक्ष खलील सैफ सय्यद यांच्या स्वाक्षरीने प्रा. वाघ यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात संघटना अधिक भक्कम आणि गतिमान करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देशही नियुक्तीपत्राद्वारे देण्यात आले आहेत.
प्रा. दत्तात्रय वाघ गेल्या सुमारे चाळीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. अभ्यासपूर्ण लेखन, वैचारिक मांडणी आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित शहादा येथील कनिष्ठ महाविद्यालयात त्यांनी उपप्राचार्य म्हणूनही दीर्घकाळ सेवा बजावली असून, शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील त्यांच्या दीर्घ अनुभवाचा तसेच वैचारिक नेतृत्वाचा लाभ नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस विचार विभागाला होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या नियुक्तीबद्दल खासदार अॅड. गोवाल पाडवी, माजी मंत्री अॅड. के. सी. पाडवी, अॅड. पद्माकर वळवी, ज्येष्ठ नेते राजेंद्रकुमार गावित, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपकभाई पटेल, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते आणि पत्रकार बांधवांनी प्रा. वाघ यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.










