शेतकरी दाम्पत्याची साडेसात एकर मोसंबी बाग अखेरची घटका मोजतेय; सात वर्षांच्या मेहनतीवर पाणीटंचाईचे संकट
जावळी (ता. औसा) | प्रतिनिधी :
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सातत्याने बसत असून, कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशा दुहेरी संकटात शेतकरी भरडला जात आहे. औसा तालुक्यातील जावळी येथील शेतकरी राजेंद्र रामराव मुळे आणि त्यांच्या पत्नी राजाबाई मुळे यांच्या साडेसात एकर मोसंबी बागेवर सध्या पाण्याअभावी मोठे संकट ओढवले आहे.
मुळे दाम्पत्याने गेल्या सात वर्षांपासून पोटच्या लेकराप्रमाणे मोसंबीच्या झाडांची निगा राखली. कष्ट, मेहनत आणि मोठ्या अपेक्षेने उभी केलेली ही बाग यंदा चांगले उत्पन्न देईल, अशी त्यांना आशा होती. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने मोसंबीच्या झाडांना पुरेसे पाणी मिळत नाही. परिणामी, झाडांवरील मोसंबीची फळे सुकून खाली पडत आहेत. डोळ्यांदेखत हिरवीगार बाग उजाड होत असल्याचे पाहून शेतकरी दाम्पत्य हतबल झाले आहे.
गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीतून सावरत यंदा तरी मोसंबीच्या बागेतून आर्थिक हातभार लागेल, अशी अपेक्षा मुळे दाम्पत्याने ठेवली होती. मात्र, यंदाच्या दुष्काळाने त्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. सात वर्षे जपलेल्या बागेचे नुकसान होत असल्याने त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
एकीकडे बागेसाठी लाखो रुपयांचा खर्च, तर दुसरीकडे उत्पन्नाची आशा मावळत चालली आहे. मागील वर्षी अतिवृष्टीने नुकसान केले आणि यंदा दुष्काळामुळे उभ्या फळबागेवर संकट आले आहे. या परिस्थितीत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नुकसानग्रस्त मोसंबी बागेची पाहणी करावी आणि शेतकरी दाम्पत्याला योग्य ती आर्थिक मदत द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.








