सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे बर्दापूर परिसरातून पर्स हस्तगत; अंबाजोगाई शहर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक
केज | प्रतिनिधी : सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी पोलीस प्रशासन किती तत्परतेने काम करू शकते, याचा प्रत्यय अंबाजोगाई शहर पोलिसांनी पुन्हा एकदा आणून दिला आहे. दिवाळीनिमित्त अंबाजोगाई येथे आलेल्या महिलेची दागिने आणि मौल्यवान वस्तू असलेली हरवलेली पर्स पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोधून काढली. तब्बल २ लाख ८६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल सुरक्षितपणे परत मिळवून दिल्याने पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
पूजा गजानन भांगरे (रा. सोलंकरवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) या दिवाळीनिमित्त अंबाजोगाई येथे वडील गोवर्धन दादासाहेब भुसारे यांच्याकडे आल्या होत्या. परत गावी जात असताना अंबाजोगाई बसस्थानकावर बसमध्ये चढण्याच्या घाईत त्यांची दागिने व मौल्यवान वस्तू असलेली पर्स बसस्थानकातच राहिली. काही वेळाने पर्स हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी पतीसह अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, ८० ते ८५ वर्षे वयोगटातील एक व्यक्ती पर्स उचलताना दिसून आली. मात्र, संबंधित व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने पोलिसांनी पर्समधील मोबाईलचे लोकेशन तपासले. त्यावेळी मोबाईलचे लोकेशन बर्दापूर परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे संबंधित व्यक्तीची ओळख पटवून पोलिसांनी बर्दापूर परिसरातून पर्स हस्तगत केली.
पर्समधील मुद्देमाल असा :
- एक तोळ्याचे मिनी गंठण – १ लाख ४५ हजार रुपये
- चार ग्रॅमचे मिनी मंगळसूत्र – ५६ हजार रुपये
- अर्धा ग्रॅम बदाम – ७ हजार रुपये
- चार ग्रॅमचे कानातील दागिने – ५६ हजार रुपये
- मोबाईल – २० हजार रुपये
- स्मार्ट वॉच – २ हजार रुपये
- साधे घड्याळ – ५०० रुपये
असा एकूण २ लाख ८६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी सुरक्षितपणे हस्तगत करून पूजा भांगरे यांना अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात परत केला. हरवलेले दागिने आणि मौल्यवान वस्तू पुन्हा मिळाल्याने भांगरे कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पोलीस हवालदार बदाम आरसूळ आणि पोलीस नाईक तेजस वावळे यांनी तपासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि स्थानिक माहितीचा प्रभावी वापर करून पोलिसांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद ठरली आहे. नागरिकांच्या अडचणीच्या प्रसंगी त्यांच्या मदतीला धावून जाण्याची पोलिसांची भूमिका या घटनेतून अधोरेखित झाली असून, अंबाजोगाई शहर पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.











