संदीप पाटील यांच्या पुढाकाराने शिक्षण हक्क पदयात्रा व सत्याग्रह; सरकारी शाळा वाचविण्यासह मोफत गुणवत्तापूर्ण शिक्षणाची मागणी
पेण | प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील विनोबा भावे यांचे जन्मस्थान असलेल्या गागोदे बुद्रुक येथे मंगळवार, दि. १ डिसेंबर २०२६ पासून ‘गरजवंत विद्यार्थ्यांचा लढा, शिक्षण हक्क सत्याग्रह’ आयोजित करण्यात आला आहे. सत्यशोधक सर्वोदय संघटना आणि अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा यांच्या सौजन्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. समाजसेवक संदीप पाटील यांच्या पुढाकाराने तसेच संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून या सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, सरकारी शाळांचे अस्तित्व टिकून राहावे आणि शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, या उद्देशाने संदीप पाटील आणि संघटनेचे कार्यकर्ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या अलिबाग अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळांना भेटी देऊन तेथील शैक्षणिक परिस्थिती, आवश्यक सुधारणा आणि विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या यांचा आढावा घेतला जात असल्याचे आयोजकांनी सांगितले.
आयोजकांच्या म्हणण्यानुसार, रायगड जिल्ह्यात ३०० पेक्षा अधिक शाळा बंद झाल्या असून, ३६० शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच देशभरात ९२ हजार आणि महाराष्ट्रात १० ते १२ हजार शाळा बंद करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या परिस्थितीचा परिणाम गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर संदीप पाटील यांनी शिक्षण हक्क पदयात्रा आणि सत्याग्रहाचा लढा सुरू ठेवला आहे. या लढ्याला विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सत्याग्रहातील प्रमुख मागण्या
१. सरकारी शाळा, विद्यालये आणि महाविद्यालये वाचली पाहिजेत.
२. भारतातील प्रत्येक मुलाला अंगणवाडीपासून उच्च शिक्षणापर्यंत मोफत, सन्मानपूर्वक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे.
पालक, शिक्षक आणि नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
दि. १ डिसेंबर २०२६ पासून गागोदे बुद्रुक येथे सुरू होणाऱ्या शिक्षण हक्क सत्याग्रहात रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षकवर्ग, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन समाजसेवक संदीप पाटील आणि आयोजक संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.











