संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील मदत वाढविण्याची मागणी; प्रदेशाध्यक्ष संजय बाबुराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदनाद्वारे मागणी
सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी : राज्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत दरमहा ६ हजार रुपये पेन्शन लागू करण्यात यावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय बाबुराव देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.
वाढत्या महागाईच्या काळात राज्यातील दिव्यांग बांधवांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. दैनंदिन गरजा, नियमित औषधोपचार आणि सन्मानाने जगण्यासाठी लागणारा खर्च भागविणे त्यांच्यासाठी कठीण झाले आहे. सध्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अपुरे ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनेक दिव्यांग नागरिकांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्यामुळे उदरनिर्वाहासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागत असल्याचेही म्हटले आहे.
‘दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६’ मधील तरतुदींनुसार दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, यासाठी त्यांच्या मासिक आर्थिक मदतीत भरीव वाढ करणे आवश्यक असल्याचे पार्टीने निवेदनात म्हटले आहे. राज्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून दरमहा ६ हजार रुपये पेन्शन लागू करण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

या निवेदनाच्या प्रती राज्याचे दिव्यांग कल्याण मंत्री, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी यांनाही पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आल्या आहेत.
यावेळी प्रदेशाध्यक्ष संजय बाबुराव देसाई यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष मनोज सातोसे, खजिनदार रोशन घाडी आणि पक्षाच्या महिला कार्यकर्त्या सौ. राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.











