मुख्यमंत्री व दिव्यांग कल्याण मंत्र्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय कळविण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन
कणकवली | प्रतिनिधी : राज्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत दरमहा ६ हजार रुपये पेन्शन लागू करण्यात यावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांची गुरुवार, दि. २० नोव्हेंबर रोजी कणकवली येथील निवासस्थानी भेट घेऊन निवेदन सादर केले.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीच्या शिष्टमंडळाचे म्हणणे सहानुभूतीपूर्वक ऐकून घेतले. या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री आणि दिव्यांग कल्याण मंत्र्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून सरकारकडून सहकार्य करण्याबाबत योग्य तो निर्णय कळविण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांसोबत आपण सदैव असल्याची ग्वाहीही पालकमंत्र्यांनी दिली.
निवेदनात म्हटले आहे की, वाढत्या महागाईमुळे राज्यातील दिव्यांग बांधवांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती कठीण झाली आहे. दैनंदिन गरजा, नियमित औषधोपचार आणि सन्मानाने जगण्यासाठी लागणारा खर्च भागविणे अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना अवघड जात आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत मिळणारे सध्याचे अनुदान मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अपुरे ठरत असल्याचे पार्टीने नमूद केले आहे.
अनेक दिव्यांग नागरिकांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्याने उदरनिर्वाहासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते. ‘दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६’ मधील तरतुदींनुसार दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने जगता यावे, यासाठी त्यांच्या मासिक आर्थिक मदतीत भरीव वाढ होणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
राज्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा ६ हजार रुपये पेन्शन लागू करण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीने केली आहे.
यावेळी प्रदेशाध्यक्ष संजय देसाई, सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष मनोज सातोसे यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.











