जलकुंभनिहाय नियोजनाची सोमवारपासून अंमलबजावणी; रविवारी मात्र सर्व भागांत नियमित पाणीपुरवठा
पनवेल | वार्ताहर :
पनवेल शहरात अनेक भागांमध्ये सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असतानाच, हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर पनवेलकरांना सोमवारपासून आठवड्यातील एक दिवस पाणीपुरवठा बंदचा सामना करावा लागणार आहे. शहरातील जलकुंभनिहाय आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या नियोजनाची अंमलबजावणी पनवेल महानगरपालिकेने सोमवारपासून सुरू केली आहे.
दिवाळीपूर्वीच या नियोजनाची अंमलबजावणी सुरू होणार होती. मात्र, काही लोकप्रतिनिधींनी दिवाळी सणानंतरच हा निर्णय लागू करण्याची मागणी केल्यामुळे त्याची अंमलबजावणी लांबणीवर पडली होती. अखेर सोमवारपासून शहरातील विविध जलकुंभनिहाय आठवड्यातील एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन महापालिकेने जाहीर केले आहे.
आठवड्यातील रविवार वगळता इतर दिवसांसाठी हे नियोजन आखण्यात आले आहे. त्यामुळे रविवारी पनवेल शहरातील सर्व भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. या नियोजनानुसार संबंधित जलकुंभांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना आठवड्यातील एका दिवसाच्या पाणीपुरवठा खंडित होण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.










