२५ नोव्हेंबरला पाणी सोडल्याची घोषणा; भुजबळ, महाजन आणि आमदार दराडे यांच्या योगदानावरून राजकीय वर्तुळात चर्चा
येवला | प्रतिनिधी :
अनेक दिवसांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या येवला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. पालखेड डाव्या कालव्याचे पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. पाण्याच्या प्रतीक्षेला दिलासा मिळाल्याने शेतीच्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
पालखेडच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि विविध पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू होते. अखेर २५ नोव्हेंबर २०२६ रोजी पालखेडचे पाणी सोडल्याची घोषणा करण्यात आली. मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या आदेशाने पाणी सोडण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जलसिंचन सेलच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या पोस्टरमधून करण्यात आला आहे. ‘बोल तसे चाले, त्यांची वंदावी पाऊले’ अशा शब्दांत भुजबळ यांच्या निर्णयाचे कौतुक करण्यात आले आहे.

दुसरीकडे, पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन आणि आमदार किशोर भाऊ दराडे यांचेही या निर्णयातील योगदान अधोरेखित करत शिवसेनेचे येवला तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांनी शेतकरी बांधवांच्या वतीने जाहीर आभार व्यक्त केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस जलसिंचन सेलचे नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. मोहन शेलार यांनीही भुजबळ आणि समीर भाऊ यांचे आभार मानले आहेत.
पालखेडचे पाणी सोडल्याच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात श्रेयवादाची चर्चा रंगू लागली आहे. मात्र, शेतकऱ्यांसाठी कोण पुढे आले, यापेक्षा त्यांच्या शेतात प्रत्यक्ष पाणी पोहोचणे अधिक महत्त्वाचे आहे. कालव्यात पाणी सोडण्याची घोषणा झाली असली, तरी ते पाणी शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार का, हा खरा प्रश्न आहे.
येवल्यातील शेतकऱ्यांना आश्वासनापेक्षा प्रत्यक्ष पाण्याची गरज आहे. त्यामुळे कालव्याचे आवर्तन सुरळीत सुरू राहावे, पाण्याचे योग्य नियोजन व्हावे आणि एकाही शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे.
अखेर राजकीय श्रेय कोणीही घ्यावे; मात्र शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचले पाहिजे. कारण शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणारा पाण्याचा प्रत्येक थेंबच खऱ्या कामाची पावती ठरणार आहे.









