इनर व्हील क्लब ऑफ दोंडाईचाचा उपक्रम; रेल्वे स्टेशन आणि महाविद्यालय परिसरात विविध कार्यक्रम
दोंडाईचा | प्रतिनिधी :
महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस २५ नोव्हेंबर रोजी जगभर पाळला जातो. या दिवसाचे औचित्य साधून इनर व्हील क्लब ऑफ दोंडाईचा, डिस्ट्रिक्ट ३०६ यांच्या वतीने महिलांचे संरक्षण, हिंसाचाराला आळा घालणे आणि समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘ऑरेंज द वर्ल्ड’ अभियान राबविण्यात आले.
दोंडाईचा शहरात रेल्वे स्टेशन परिसर आणि श्रीमान दादासाहेब रावल नॉलेज सिटी महाविद्यालय परिसर अशा दोन ठिकाणी हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या अभियानात रावल नर्सिंग कॉलेज, राऊळ कॉलेज ऑफ लॉ आणि रावल फार्मसी कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी पथनाट्य, नृत्य, घोषणाबाजी आणि जनजागृतीपर सादरीकरणांच्या माध्यमातून महिलांवरील विविध प्रकारच्या हिंसाचाराबाबत संदेश दिले. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी असलेले कायदे, महिलांचे कायदेशीर अधिकार तसेच महिला व बालिकांच्या संरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या तरतुदींची माहिती देण्यात आली.
अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, हिंसाचाराच्या घटनांबाबत मौन न बाळगता योग्य ती कृती करणे आणि महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे, हा अभियानाचा मुख्य संदेश होता. यावेळी आज्ञा अभिजित दोंदे हिने नृत्य सादर केले.
या उपक्रमात क्लबच्या अध्यक्ष डॉ. नेहा पारख, उपाध्यक्ष डॉ. अवणी पाटील, सचिव शीतल अग्रवाल, खजिनदार प्रिया सिसोदिया, आयएसओ डॉ. दीपाली नागरे, संपादक मनीषा गुजराथी, ज्येष्ठ सदस्या डॉ. मंजुलता अग्रवाल आणि रत्नमाला जैन सहभागी झाल्या.
प्रोजेक्ट चेअरमन लीना दोंदे, प्रोजेक्ट को-चेअरमन ॲड. स्नेहा आयचित, तसेच मरियम, अर्चना, डॉ. अर्चना पाटील, डॉ. जयश्री पाटील, पूजा बोरसे, स्मिता पवार आणि क्लबच्या इतर सदस्यांनीही सहभाग नोंदविला.
लीना दोंदे आणि ॲड. स्नेहा आयचित यांच्या नियोजनातून तसेच क्लब सदस्यांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला. रेल्वे स्टेशनसारख्या सार्वजनिक ठिकाणी आणि महाविद्यालयीन परिसरात अभियान राबविल्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा आणि सन्मानाचा संदेश नागरिक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
महिलांवरील हिंसाचार रोखणे ही संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला.











