समता शिक्षक परिषद व समतावादी साहित्य मंडळातर्फे २९ नोव्हेंबरला कार्यक्रम; जिल्हा व राज्यस्तरीय ४४ शिक्षकांचा होणार सन्मान
एरंडोल | प्रतिनिधी :
समता शिक्षक परिषद आणि समतावादी साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित २६ पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आणि गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन २९ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. शहरातील कमल लॉन येथे सकाळी ११.४५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन आणि गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता शिक्षक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डी. के. अहिरे आणि प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ असतील. जळगाव जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील, व्याख्याते व पत्रकार किरण सोनवणे, खासदार स्मिता वाघ, आमदार ॲड. अमोल पाटील, शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात २६ लेखकांनी महात्मा फुले यांच्या कार्यावर लिहिलेल्या २६ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील ३८ शिक्षकांना जिल्हास्तरीय आणि राज्यातील सहा शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाची माहिती समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांनी एरंडोल येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड, भैय्यासाहेब सोनवणे, प्रकाश तामस्वरे, चिंतामण जाधव आणि वर्षा शिरसाठ उपस्थित होते.










