शहापूर:दि.२१
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. संपूर्ण राज्यभरात ही मतदानाची प्रक्रिया राबवण्यात आली. सकाळी ०९ वाजेपर्यंत राज्यात ६.६१ टक्के मतदान झाले होते.तर संध्याकाळी ०५ वाजेपर्यंत ठाणे जिल्ह्यात ३८ टक्के व पालघर मधे ४६ टक्के मतदान झाले होते.तर तालुक्यात संध्याकाळी ०५ वाजेपर्यंत एकूण ५९.१२ टक्के मतदान झाले आहे.
निवडणुकीचा निकाल येत्या २३ नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाईल. संपूर्ण राज्यात एकूण २८८ जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यासाठी राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानाची प्रक्रिया चालू झाली होती. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार होते.
या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. शहापूर विधानसभा क्षेत्रात एकूण नऊ उमेदवार आपले नशिब अजमावत असून जनता कोणाला कौल देते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे .
अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दौलत दरोडा जिंकणार की शरदचंद्र पवार गटाचे मा.पांडुरंग बरोरा अथवा शहापूर विधान सभा क्षेत्रातील जनता नवा पर्याय असलेल्यांना संधी देणार याकडेही सर्वांचेच लक्ष लागले आहे.
काही ठिकाणी सोशल मीडियावरून जिजाऊ विकास पार्टीच्या अपक्ष उमेदवार श्रीमती रंजनाताई उघडा यांनी विध्यमान आमदार दौलत दरोडा यांना पाठिंबा दिल्याचे संदेश फिरत होते,
यावर संपर्क केला असता जिजाऊच्या कार्यकर्त्यांनी आमदार साहेबांनी सत्तेत असतांना कुठलीही विधायक कामे न केल्याने विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली असून त्यांना त्यांचा पराभव दिसत असल्याचे सांगत सदर वृत्ताचे खंडन केले असून विजय आपलाच असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
Discussion about this post