भरत पुंजारा
ग्रामीण प्रतिनिधी पालघर
डहाणू तालुक्यातील निकणे दाभीपाडा (कातकरीपाडा) येथे दि. २४ नोव्हेंबर रोजी शार्दूल हर्षद औधकर यांच्या वाढदिवसानिमित्त ७५ विद्यार्थ्यांना बूट आणि खाऊ वाटप करण्यात आले. हा उपक्रम शार्दूलच्या कुटुंबीयांनी त्यांच्या आजोबांच्या शिक्षणाविषयीच्या प्रेमाला आदरांजली म्हणून राबवला. शार्दूलचे आजोबा शिक्षणाची आवड असतानाही हलाखीच्या परिस्थितीमुळे अडचणींचा सामना करत होते. त्यामुळे आजच्या मुलांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागू नये, हा उद्देश या उपक्रमामागे होता.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना बूट आणि खाऊचे वाटप करण्यात आले. याशिवाय मानव कल्याण सेवा संघ रजि. या संस्थेच्या वतीने मुलांना खेळणी व कपडे वाटण्यात आले. या उपक्रमामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आणि ग्रामस्थांनाही समाधान वाटले. संस्थेच्या प्रतिनिधींनी गावकऱ्यांशी संवाद साधत भविष्यात अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमात हर्षद जयवंत औधकर, जयवंत औधकर, रोहिणी औधकर, वैशाली हर्षद औधकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सरपंच अभिजीत देसक, उपसरपंच सुदाम मेरे, प्रविण वरठा, दिलीप घोषे आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला. या प्रयत्नांमुळे गावातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
Discussion about this post