
बबन यादव..
माझी सरपंच चिपरी..
शिरोळ विधानसभेची निवडणूक नियोजनबद्ध लढताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या निवडणुकीत मिळवलेला निर्विवाद विजय आणि त्यांना मिळालेले मताधिक्य विरोधकांना आत्मचिंतन करायला लावणारे आहे, केवळ विरोधासाठी विरोध म्हणून राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या समोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न या निवडणुकीत विरोधकांनी केला पण शिरोळच्या जनतेने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवून जातीपातीच्या राजकारणाला हद्दपार करत हक्काचा आणि कामाचा माणूस म्हणून आमदार राजेंद्र यड्रावकर यांना साथ दिली.
आणि विरोधी उमेदवारांना धोबीपछाड दिली, 2019 च्या विधानसभेला सामोरे जाताना आमदार यड्रावकर यांना संघर्ष करावा लागला होता, ज्या पक्षाच्या वाढीसाठी स्व. शामरावआण्णा पाटील यड्रावकर आणि त्यानंतर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मोठं काम केलं होतं त्या पक्ष नेतृत्वाने ऐनवेळी दगा देत दिलेला ए.बी. फॉर्म काढून घेतला, आणि मग यड्रावकरांना अपक्ष म्हणून लढावं लागलं,त्याही वेळी यड्रावकरांच्या विरोधात हीच सर्व मंडळी होती, उद्यान पंडित गणपतराव दादांनी तर यड्रावकरांच्या विरोधात अगदी पावसात भिजत जयसिंगपुरात शेवटची सभा घेतली होती, 2019 मधल्या गणपतराव दादांच्या त्या निवडणुकीतील भूमिकेमुळे स्व. सारे पाटील साहेब आणि आमदार राजेंद्र पाटील
यड्रावकर यांच्या गटामध्ये काही अंशी दरी निर्माण झाली पण सारे पाटील साहेबांना मानणाऱ्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना गणपतराव दादांचा हा निर्णय रुचला नाही त्यामुळे बहुतांश कार्यकर्त्यांनी यड्रावकरांना साथ देणे पसंत केले आणि प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष यड्रावकरांना मदत देखील केली, सारे पाटील गट आणि यड्रावकर गटामध्ये निर्माण झालेली दरी ब याचा फायदा उठवण्यासाठी या दोन्ही गटांमध्ये उभी फूट पडावी यासाठी काही घटकांनी त्यानंतरच्या काळात देखील जाणीवपूर्वक काम केले, त्यांच्या प्रयत्नांना यश आले पण यामध्ये नुकसान झाले ते गणपतराव दादांचे जिल्हा पातळीवरील नेत्यांनी आणि जवळच्या कार्यकर्त्यांनी सांगून देखील अपेक्षित संख्याबळ नसताना दादांनी केडीसी बँकेची निवडणूक लढवली आणि दादा पराभूत झाले,
तेंव्हापासून संघर्ष आणखी वाढला आणि त्याला खतपाणी घालण्याचे काम काही जणांनी राजकीय व इतर सर्व प्रकारच्या लाभासाठी जाणून बुजून केले, मुळात सारे पाटील गट आणि यड्रावकर गट यांच्यामध्ये अंतर आणण्यासाठी ज्यांनी आगीत तेल ओतलं यामध्ये तेल ओतणाऱ्यांचे देखील नुकसान झाले,पेटलेल्या या आगीमध्ये मग त्यांना स्वतःची झोपडी देखील वाचवता आली नाही, खरे तर राज्यात परिवर्तन करायला निघालेल्या माजी खासदारांना तर स्वतःच्या होम ग्राउंड वर परिवर्तन घडवण्यात अपयश आलं, सोयीच्या राजकारणाने घेतली गेलेली गळाभेट माजी खासदार व माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांना देखील आवडली नाही आणि यातूनच अनामत रक्कम जप्त होण्याचा सिलसिला पुन्हा कायम राहिला, व्यक्तीद्वेषाच राजकारण किती करायचं याचं भान हरवलेल्या विरोधकांना या निवडणुकीच्या निकालाने मोठी चपराक दिली, राजकारण भावनेवर अथवा जाती पातीवर चालत नाही तर ते नेतृत्व, कर्तुत्व आणि विकासावर चालतं हे शिरोळच्या जनतेने अधोरेखित केलं, या निवडणुकीत विरोधकांनी भान सोडून आमदार यड्रावकर यांच्यावर अगदी व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका टिपणी केली पण आमदार यड्रावकर यांनी शेवटपर्यंत एकाही विरोधकाबद्दल अवमानकारक शब्द वापरला नाही किंवा आपल्या सहकाऱ्यांना देखील तशी ताकीद दिली, आपण केलेलं काम आणि शिरोळ तालुक्याच्या भविष्यातील विकासाच्या संकल्पना त्यांनी लोकांसमोर मांडल्या, नियोजनबद्ध प्रचार, मंत्री अथवा आमदार असताना तालुक्यातील गावागावांशी जोडलेली नाळ, प्रत्येकाच्या सुखदुःखात जाऊन सातत्याने ठेवलेला संपर्क, सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन पुढे जाण्याची त्यांची भूमिका त्यांना फायदेशीर ठरली,अगदी युवकांसह वडीलधारी मंडळी, महिला, लाडक्या भगिनींमध्ये देखील कामातून त्यांनी आत्मीयता निर्माण केली, लहान बंधू माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचे नेटके नियोजन आणि महायुतीतील सर्वच पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलेले पाठबळ, यड्रावकर गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेले कष्ट या गोष्टी त्यांच्या विजयाचे फलित म्हणावे लागेल, 2019 ला अपक्ष लढताना त्यावेळी त्यांनी शिरोळ तालुक्याच्या जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्ती कामातून पूर्ण केली रस्ते, गटारी, पाणीपुरवठा नागरिकांच्या या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देताना, शिरोळ तालुक्यातील शासकीय आरोग्य सेवा भक्कम केली, दूरदृष्टीने क्रीडा संकुल, महावितरणचे नवीन सबस्टेशन, अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी वसतिगृहे,
जयसिंगपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा अशा मोठ्या कामांसाठी भरीव असा निधी शासनाच्या माध्यमातून खेचून आणला आणि तालुक्यातील जनतेचा विश्वास दृढ केला, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले पण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आमदार यड्रावकरानी उभारले तर या माणसाला भविष्यात रोखता येणार नाही याचा धसका घेतलेल्या विरोधकानी जाणून बुजून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या संदर्भात समाज बांधवांची दिशाभूल करून आमदार यड्रावकरांची बदनामी करत पुतळा उभारण्यात अडथळे निर्माण केले, पण यातूनही आमदार यड्रावकरांनी आंबेडकरवादी विविध संघटना आणि समाजातील प्रमुखांची चर्चा करून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचा प्रश्न मार्गी लावला, लवकरच जयसिंगपूर शहरात निळ्या वादळाच्या साक्षीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे आगमन होईल असा शब्द आमदार यड्रावकरानी शिरोळच्या जनतेला दिला आहे,खरे तर पूर्वीपासून एकत्र असलेला सारे पाटील साहेब आणि यड्रावकर साहेबांचा गट राजकीय कारणासाठी विभागू नये अशी दोन्ही गटातील मान्यवरांची मानसिकता होती पण शेवटी ते घडलेच,स्व. सारे पाटील साहेब यांच्या कामाचा आवाका मोठा होता, त्यांच्याकडे राजकीय मुत्सद्दीपणा होता, राजकारणात कधी आणि कुठे थांबायचं साहेबांना माहीत होतं, ते आपल्या सहकाऱ्यांशी मते जाणून घेत असत पण कोणाचं कधी आणि किती ऐकायचं हे ते स्वतः ठरवत असत, गणपतराव दादांनी नेमकी उलटी भूमिका राजकारणात घेतली आणि नको त्यांचं नको तितकं ऐकल्यामुळे त्यांना अपयश येत गेलं, राजकारणात स्थित्यंतरे होत असतात जय पराजय हा असतोच पण हे सर्व करत असताना टोकाच्या विरोधामुळे नाती आणि आपलेपणामध्ये दुरावा निर्माण होतो, मोठे साहेब असते तर या घटना टळल्या असत्या दोन्ही गट दुभंगले नसते, या निवडणुकीच्या निकालाने सारे पाटील साहेबांच्या राजकीय वारसदारावर जनतेने शिक्कामोर्तब केला आहे, राजकीय वारसदाराला जसा सन्मान प्राप्त होत गेला आहे, हातात हात घालून पुढे जाण्याची भूमिका घेतली असती तर रक्ताच्या वारसदाराला देखील न्याय मिळाला असता असे म्हणावे लागेल, सारे पाटील यड्रावकर गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये गावागावांमध्ये आज देखील ऋणानुबंध आहेत, शिरोळ तालुक्याच्या प्रगतीसाठी यापुढेही ते कायम राहतील अशी आशा करणे चुकीचे ठरणार नाही.
बबन यादव
माजी सरपंच चिपरी..
Discussion about this post