तालुका प्रतिनिधी – समीर बल्की
चंद्रपूर/भिसी :- चंद्रपूर, नागपूर व भंडारा या तिन्ही जिल्ह्याच्या सीमा हद्दीवर वसलेलं तथा चिमूर-कांपा-नागपूर मार्गावरील शंकरपूर, कांपा, भुयार, निलजफाटा व भिवापूर या गावापासून ७ ते ८ कि. मी. अंतरावर आड बाजूस असलेल छोटस गांव साठगाव. एकेकाळी साठ घराची वस्ती असलेल नी आता अंदाजे १८०० ते २००० लोकसंख्या असणारं हे गाव भोसलेकालीन काळात काही नैसर्गीक आपत्ती व पेंढारी (लुटारू) यांच्या लुटीत पूर्णपणे उध्वस्त झाले होते. या गावाचे आकर्षण म्हणजे आज गावालगतच्या टेकडीवर उभे असलेल श्रीदत्तात्रेय प्रभूचे भव्य पुरातन मंदिर.
याबाबत थोडक्यात असे कि, इ.स. १७८५ मध्ये चांदापूर (जी.चांदा) राजे भोसले यांचेशी इंग्रजाच्या लढाईचा उल्लेख महानुभाव ग्रंथामध्ये आला आहे. त्यावेळी माहूर संस्थान मधून भोसलेकालीन राज्याचा कारभार पहिला जात असे. त्याकाळात राजे भोसले यांचेकडून विजयी सेनाप्रमुख गावंडे कुटुंबातील पराक्रमी व्यक्तीला परागणे ‘साठगाव’ चिमूर हा भाग मालगूजारीत मिळाला. गावंडे कुटुंब मुळ यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस गावचे यांचा माहूर संस्थानशी पूर्वीपासून सबंध होता.
गावंडे कुटुंब साठगावला मालगुजार म्हणून स्थाईक झाले व त्यांनी श्रीदत्तात्रेय प्रभू यांचे निद्रास्थान देवदेवेश्वरी संस्थान, माहूर येथे खाचर बैलाने देवदर्शानाकरिता माहुरवारी सुरु केली. पूर्वीच्याकाळी तीर्थयात्रेवरून परत आल्यानंतर गावाचे शिवेवर किंवा मंदिरात एक रात्र मुक्काम केल्या जात असे. अशाच एका वारीमध्ये मालगुजार गावंडेपाटील यांनी सुध्दा त्याकाळी गावापासून दूर असलेल्या टेकडीवर मुक्काम केला असता त्यांना स्वप्न पडले मी तुझे सोबत आहे. याच स्थळी माझी पुजेची व्यवस्था कर या गावाचे भाग्य उदयास येईल. तेथे पाहणी केली असता ‘सर्वतीर्थ’ माहूर येथील विशेष असल्याचे दिसले. तेव्हापासून झोपडीवजा मंदिरात विशेषाची स्थापना करून त्रिकाळ पूजाअर्चा सुरु केली असून आजही नित्यक्रमाने सुरु आहे.
गावंडे कुटुंबाचे स्वप्न साकार झाल्यानंतर इ.स. १८६४ मध्ये श्रीमती राधाबाई धर्माजीपाटील गावंडे यांनी साठगाव येथे श्रीदत्तात्रेय प्रभू मंदिराचे बांधकाम सुरु केले व तेव्हापासून येथे तीन दिवसीय श्रीदत्तजयंती यात्रा महोत्सव सुरु झालेला असून आता श्रीदत्तजयंती यात्रा महोत्सव दोन दिवसाचा करण्यात आलेला आहे. राधाबाईने माहूरवारी बंद करून गोंदिया जिल्ह्यातील डाकराम-सुकळी (चक्रधर स्वामीचे चरणाकिंत स्थान) येथील वारी सुरु केली ती आजही सुरु आहे. राधाबाई नंतर त्यांचा मुलगा कवडूजीपाटील यांनी तर त्यानंतर रामचंद्रजी, हरिचंद्रजी, देविदासजी व उमेशजीपाटील यांनीही श्रीदत्तजयंती यात्रेचा वारसा जोपासला असून आजही पुढील पिढीकडून हे कार्य सुरु आहे. न्यास नोंदणी नंतर अध्यक्ष म्हणून कै.कवडूजी धर्माजीपाटील गावंडे, कै.रामचंद्र कवडूजीपाटील गावंडे व श्रीमती लीलाबाई रामचंद्रपाटील गावंडे यांनी कार्यभार सांभाळलेला आहे.
सन १९८० मध्ये कवडूजीपाटील यांनी कै.म.जयकृष्णबाबा दर्यापूरकर (वणी) यांचेकडून संन्यास दिक्षा घेतली व त्यानंतर ते साठगाव येथिल श्रीदत्त मंदिरात वास्तव्यास राहू लागले. त्यांच्या पत्नी कासुबाई व मुलगी शेवंताबाई ह्या सुध्दा वृद्धापकाळात मंदिरात वास्तव्यास होत्या. तसेच देवदेवेश्वरी संस्थान, माहूर चे विद्यमान पिठाधीश महंत श्री माहुरकरबाबा उर्फ मधुकर शास्त्री कवीश्वर हे पंधरा वर्षे, महंत सुधाकरबाबा संन्याशी (उमरखेड) हे दोन वर्षे व कै.त. भागुबाई पातुरकर (मनसळ) ह्या बारा वर्षे साठगाव येथिल श्रीदत्त मंदिरात वास्तव्यास होत्या.
या पुरातन महानुभाव श्रीदत्तात्रेय प्रभू मंदिराची उभारणी चुनखडी मिश्रित विटांनी करण्यात आली असून समोरील सभामंडप नंतर बांधून दिलेला आहे. श्रीदत्तात्रेय प्रभूच्या विशेषावर अत्यंतवेधक व कलाकुसरयुक्त चांदीचा मुखवटा बसविला आहे. लाकडी रथावरील नक्षीकाम उत्कृष्ट कलेचा नमुना असून हा लाकडी रथ साठगाव येथील कै.राखुंडे परिवार यांनी तयार केला आहे. साठगाव येथील श्रीदत्तप्रभूची महिमा पंचक्रोशीत असून चैत्र पौर्णिमा, आषाढी पौर्णिमा, नारळी पौर्णिमेस भाविक मंडळी बहु संख्येने पूजाअर्चा करण्याकरिता येत असतात. काही भक्तगण पाच दिवसापासून तर सव्वा महिन्यापर्यंत धरणे (वास्तव्यास) असतात. नवरात्रामध्ये सदभक्ताकडून येथे नउ दिवस पंगती असतात. मार्गशीर्ष महिन्यात भक्तजन सह्भोजनाकरिता येत असतात.
मार्गशीर्ष पौर्णिमेपासून येथे श्रीदत्तजयंती यात्रा महोत्सव असते. प्रथम दिवशी सकाळी श्रीदत्तप्रभूचा जन्मोत्सव, ध्वजारोहण साजरा करण्यात येते तर सायंकाळी ब्यांड व भजनाच्या गजरात तर दत्ताप्रभूचे नामघोषात विशेषाची रथशोभा यात्रा काढण्यात येते. गावामध्ये या रथशोभायात्रेचे ठीकठिकाणी स्वागत करून विशेषास विडाअवसर व उपहार समर्पण करीत असतात. तर गावातील काही सद्भक्त मंडळी रथशोभा यात्रेनिमित्य नास्ता, अल्पोपहार, चहापान व फळांचे वाटप करीत असतात. दुस-या दिवशी (मार्गशीर्ष प्रतिपदा) भजन, प्रवचन, कीर्तन, दहीहंडी, गोपाळकाला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. तर गावातील युवक मंडळी यात्रेनिमित्य आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, मैदानी खेळ व नाटकाचे आयोजन करीत असतात.वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजीबाबा यांचा भजनाचा कार्यक्रम सन १९७१ ला साठगाव येथे जि.प. प्राथमिक शाळेच्या उदघाटनप्रसंगी झाला असून त्यावेळी त्यांनी आयुर्वेदाचार्य डॉं.भैरवारदादा सह श्रीदत्तमंदिरास भेट देवून दर्शन घेतले. मध्यंतरीच्या काळात महानुभाव पंथीयांची पालखी यात्रा श्रीक्षेत्र रीद्धपूर येथील यक्षदेव मठातील कै.आचार्य म.मुरारीमल्लबाबा व कै.म.प्रभाकरशास्त्री यक्षदेव त्याचप्रमाणे कै.म.गोपिराजबाबा (जुने) तर सन २००२ मध्ये म.विद्याधरदादा पंजाबी (वाघोदा) हे मार्ग मंडळीसह साठगाव येथील श्रीदत्त मंदिरात धर्म प्रचारासाठी आलेले होते. सन २०२२ मध्ये जाधववाडी येथील आचार्य मोठेबाबा मार्ग मंडळीसह पुयारदंड, त.भिसी येथे वास्तव्यास आले असताना साठगाव येथील श्रीदत्त मंदिरात दर्शनाकरिता आले होते.
तसेच नागराजबाबा उर्फ गोपिराजबाबा शास्त्री (रीद्धपूर),न्यायबांसबाबा उर्फ सैंगराज शास्त्री (मकरधोकडा), साहित्याचार्य.बा.भो.शास्त्री(करमाड),एकोबासबाबा उर्फ वसंतराज शास्त्री (खुटाळा चंद्रपूर),मुधोव्यासबाबा उर्फ संजयराज शास्त्री (एकार्जुना वरोरा),.परसराजबाबा उर्फ संतोषराज शास्त्री (वणी), कळमकरबाबा (गाढेजळगाव), म.श्री.दत्तराजबाबा शेवलीकर (सोलापूर),प्रभाकारदादा कपाटे (भोकर),.सायराजदादा पुजदेकर (नाशिक), गोविंदराजदादा बिडकर (लातूर), .निर्मलमुनी बाभूळगावकर (जालीचादेव),उध्दवराज दिवाकरबाबा (लोणारा भद्रावती), देपेराजबाबा (नागपुर), कृष्णामुनी (रीद्धपूर),वंकीराजदादा अस्टूणकर (डाकराम सुकळी), कान्हेराजदादा (काटोल), संजयदादा भोजने (जालीचादेव), योगीराजदादा (हदगाव), त.पुष्पाताई विराट (मकरधोकडा), त.डॉं.मालतिताई बिडकर, त.विमलताई शेवलीकर (विठ्ठलवाडी नागपूर), त.विमलताई शीवनेकर (दहेगाव), किर्तंनकार दामोधरशाहीर वाजीरगावकर (नांदेड),दादाराव उके (नेर), म.बिडकरबाबा (सातारा), म.माधव्यासबाबा (सालबर्डी), मनोहर फाये, दुलीचंद तुरकर, अमर ठमके, योगेश कपाटे, सुरेशभाऊ वाईन्देशकर, ह.भ.प. पंजाबराव अंभोरे, ह.भ.प.चांगदेवदादा (सालोरी), ह.भ.प. नामदेवदादा (टाका), कै.म.राजेन्द्रप्रसाद शेवलीकर उर्फ म.सुगावकर (बदनापूर), कै.म. अशोकशास्त्री माहुरकर (माहुर), कै.म. दयालमुनी अन्कुलनेरकर (वडवाडी, पैठण), कै.म.चक्रपानीबाबा (मौदा), कै.म.शिवनेकरबाबा (दहेगाव), कै.म.विलासशास्त्री (वणी), कै.म.नागापुरकरबाबा (चिंचभूवन), राष्ट्रीय किर्तनकार कै.म.कपाटेबुवा, कै.म.यादोबुवा (टाका), कै.म.श्यामसुंदरशास्त्री (नागपूर) कै.म.श्रावणबुवा (साठगाव), कै.माणिकलाल बारसागडे, समाजसेविका शकुंतलाबाई कपाटे, आदींनी श्रीदत्त जयंती यात्रा महोत्सवानिमित्य उपस्थित राहून प्रवचन, किर्तन, भजन यामधून महानुभाव पंथाचे तत्वज्ञान, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, अहिंसा, आत्महत्या, बुवाबाजी, कर्मकांड, स्वच्छता अभियान, समाजप्रबोधन याबाबत जनजागृती केलेली आहे.
त्याचप्रमाणे देशभक्त वामनराव गावंडे, कै.माजी खासदार नामदेवराव दिवटे, कै.माजी विधानसभा उपाध्यक्ष मो.वी.टेमुर्डे, कै.माजी आमदार मेश्राम साहेब, कै.माजी आमदार वसंतराव इटकेलवार, माजी राज्यमंत्री डॉं.रमेश गजभे, माजी आमदार डॉं.अविनाश वारजूकर, माजी आमदार सुधीर पारवे, जागतिक कृशीतज्ञ डॉं.रमेश ठाकरे, माजी कुलगुरू वाय.एम.टाले, न्युरो सर्जन डॉं. मिलिंद देवगावकर, डॉं.शैलेजा देवगावकर, कै.डॉं.रा.बो.मेश्राम, कै.डॉ.तू.वी.गेडाम, माजी जि.प.अध्यक्ष संतोष रावत, माजी जि.प.अध्यक्ष डॉं.सतीश वारजूकर, माजी जि.प.अध्यक्ष संतोष कुमरे, सुधाकरराव मेंघर, साजन शेंडे, प्रा.बी.जी.रडे, सर्वज्ञ विचारमंच तळोधी आदी मान्यवर मंडळी यांनी यात्रेनिमित्य सदिच्छ! भेटी दिलेल्या आहेत.
या मंदिरास तिर्थक्षेत्राचा क वर्ग दर्जा प्राप्त असून तिर्थक्षेत्र विकास निधी योजनेअंतर्गत सभामंडप, धर्मशाळा, स्वच्छतागृह, पाण्याची छोटी टाकी, पेव्हिंग ब्लाक फिटिंग, संरक्षण भिंत इ. कामे करण्यात आलेले आहेत. तसेच अर्धवट, संरक्षण भिंतीचे काम, मंदिरामागील गावाला जोडणारा अंदाजे २५० मीटरचा रस्ता पथदिव्यासह करने अत्यंत गरजेचे आहे. सदर पुरातन मंदिराचे आतील भागाचे नुतनीकरण विद्यमान महंत माहुरकरबाबा उर्फ मधुकर शास्त्री कवीश्वर यांचे आशीर्वादाने, विनोद रा. गावंडे यांचे पुढाकाराने, सदभक्त व आप्तेष्ट मंडळी यांचे सहकार्याने पूर्ण केले असून मंदिराचे बाहेरील भागाचे नुतनीकरण करणे आवश्यक आहे. सर्व गावकरी तथा परिसरातील सदभक्त व आप्तेष्ट मंडळी यांचे अपार श्रध्दा व स्नेहाने गावंडे परिवार श्रीदत्तात्रेय प्रभू मंदिर साठगाव येथिल श्रीदत्तात्रेय प्रभू जयंती यात्रा महोत्सव आजही मोठ्या उत्साहाने साजरा करतात. आणि सदभक्त मंडळी मोठ्या संख्येने येथे येवून श्रीदत्तप्रभू चरणी लीन होतात.
Discussion about this post