लाडकी बहिण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याचा कोणताही निर्णय झालेला नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. मी या खात्याची मंत्री असेपर्यंत असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्या म्हणाल्या. तशा काही तक्रारी आल्या तर सरकार पुढील निर्णय घेईल. पण अद्याप तशा तक्रारी दाखल झालेल्या नसल्याचा दावा देखील तटकरे यांनी केला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करून त्यातील महिलांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधकांच्याकडून केला जात आहे. मात्र यावर आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. लाडकी बहिण योजनेचा जीआर काढला त्यावेळी त्यात काही नियम दिले गेले होते. त्या नियमानुसारच सर्व महिलांना योजनेचा लाभ देण्यात आला असल्याचा दावा आदिती तटकरे यांनी केला आहे. सर्व निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच लाडकी बहिण योजनेचे पैसे देण्यात आले असल्याचा दावा देखील त्यांनी केला.
लाडक्या बहिणी संदर्भात नियम बदलले जाणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचे देखील तटकरे यांनी म्हटले आहे. एका घरातल्या केवळ दोन महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल, अशा प्रकारचा कोणताच नियम नसल्याचे देखील तटकरे यांनी म्हटले आहे. राज्यांमध्ये अडीच कोटी पर्यंत लाभार्थी असू शकतात, असे आम्ही सुरुवातीपासून म्हटले होते. सध्या दोन कोटी ३४ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत असल्याचा दावा तटकरे यांनी केला आहे. त्यामुळे आपण त्या आकड्याच्या जवळपासच असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांना २१०० रुपयांचा लाभ देण्याचे महायुतीने कबूल केलेले आहे. त्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याची घोषणा करणार असल्याचे देखील तटकरे यांनी सांगितले आहे. सध्या ज्या महिलांना लाभ मिळत आहे, तो पढील अर्थसंकल्पापर्यंत तसाच मिळत राहणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
Discussion about this post