भूक लागत नाही, जेवण जात नाही अशा तक्रारी अनेकांना असतात. भूक न लागण्याची कारणे ही शारीरिक आणि मानसिकही असू शकतात. काही दिवसांसाठी भूक न लागणे हे सामान्य बाब असू शकते मात्र जर अनेक दिवस भूक लागत नसेल तर नक्कीच तो चिंतेचा विषय आहे. कारण घेतलेल्या आहारातूनच शरीराचे पोषण होत असते, शरीराची झीज भरून काढली जाते.
अशावेळी भूक न लागण्याच्या समस्येमुळे पुरेसे अन्न आणि व्हिटॅमिन, खनिजे यासारखी पोषकतत्वे शरीरास न मिळाल्यास याचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात म्हणूनच भूक न लागण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नये. यासाठी येथे भूक कशामुळे कमी होते व भूक कशी वाढवावी याविषयी माहिती दिली आहे.
भूक न लागण्याची ही आहेत कारणे :
भूक न लागण्यामागे किंवा भूक कमी होण्याची अनेक कारणे असू शकतात. अगदी शारिरीक कारणांपासून ते मानसिक कारणामुळेही भूकेवर परिणाम होत असतो.
◼शारीरिक कारणांमध्ये विविध आजारांमुळे भूक कमी होते. सर्दी, ताप, काविळ, पोटाचे आजार, उलटी, अपचन, बद्धकोष्ठता, कृमींचा त्रास, पोटात गॅस होणे, पित्ताशयात खडे होणे (gallstone), मधुमेह अशा अनेक आजारांत भूक कमी होते.
◼महिलांमध्ये मासिक पाळीच्या वेळी, प्रेग्नन्सीमध्ये किंवा रजोनिवृत्तीमध्येही भूक कमी होऊ शकते.
◼प्रौढ व्यक्तीमध्ये वाढत्या वयाबरोबर भूकदेखील मंदावते. उतारवयात पचनक्रीया मंदावल्याने थोडेसे खाल्ले तरी बराच काळ पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे वय वाढल्यानेही भूक कमी होत असते.
◼अनेक औषधांमुळेही भूक कमी होते. विशेषतः अँण्टीबायोटिक्स, अँटीफंगल्स, आणि Muscle relaxant औषधांमुळे भूक कमी होऊ शकते.
◼डिप्रेशन, मायग्रेन, उच्च रक्तदाब, क्रॉनिक आजार आणि कंपवात (पार्किन्सन) या आजारावरील औषधे सुरू असल्यास भूक कमी होऊ शकते.
◼मानसिक कारणांमध्ये ताणतणाव, भीती, डिप्रेशन यांमुळे भूक कमी लागत असते. कामाच्या ताणामुळे किंवा परीक्षेच्या तणावामुळे भूक न लागण्याची समस्या होऊ शकते.
◼अपुरी झोप झाल्यामुळेही हा त्रास होऊ शकतो. पुरेशी झोप न मिळाल्यास दिवसभर सुस्ती येते, चिडचिड वाढते आणि थकवा येतो परिणामी भूक न लागण्याची तक्रार सुरू होते.
◼अयोग्य आहार म्हणजे फास्टफूड, जंकफूड, चिप्स, स्नॅक्स, कोल्ड्रिंक्स, भरपूर चहा-कॉपी पिण्यामुळेही ‘अन्न जेवताना’ भूक न लागण्याची तक्रार सुरू होते.
◼दारू, मद्यपान, सिगारेट, तंबाखू यासारख्या व्यसनांमुळेही भूक कमी होत असते.
भूक लागण्यासाठी असे केले जातात उपचार :
योग्य आहार, व्यायाम आणि औषधे याद्वारे भूक वाढवण्यासाठी उपचार केले जातात.
भूक वाढीसाठी योग्य आहार घ्यावा –
भूक लागण्यासाठी सहज पचणारा योग्य आहार घ्यावा. फास्टफूड, जंकफूड, स्नॅक्स, कोल्ड्रिंक्सपासून दूर राहावे. पोट नियमित साफ राहील याची काळजी घ्यावी. यासाठी आहारात फायबर्सचा समावेश असावा. हिरव्या पालेभाज्या, विविध फळे यांमध्ये फायबर्सचे प्रमाण भरपूर असते. पुरेसे पाणी प्यावे. दिवसभरात साधारण आठ ग्लास पाणी प्यावे. तसेच विविध व्यसनांपासून दूर राहावे.
प्रदीप खेडकर
अमरावती
Discussion about this post