सारथी महाराष्ट्राचा
शिरूर तालुका
प्रतिनिधी सुरेश आप्पा गायकवाड
माननीय पवार साहेबांना भेटायला जाताना एखादा ग्रंथ घेऊन जाणे ही माझी अनेक वर्षापासून पद्धत आहे. त्यांना अनेक ग्रंथ दिले आणि त्यातील बहुतेक त्यांच्याकडे आहेत. त्यांचे वाचन वैविध्यपूर्ण आणि अफाट आहे, त्यामुळे प्रत्येक वेळेस जाताना नाविन्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पुस्तक घेऊन जातो. अलीकडच्या काळामध्ये प्रश्न पडतो की साहेबांना कोणते पुस्तक घेऊन जायचे?. काही वर्षांपूर्वी अशाच विचारात असताना नुकतेच आलेले आणि जगभर गाजत असलेले युवाल नोआ हरारी लिखित सेपियन्स हे पुस्तक घेऊन गेलो. साहेबांना ते पुस्तक देत असतानाच त्या पुस्तकाबद्दलची माहिती सांगितली. ते पुस्तक हातात घेऊन साहेब म्हणाले “हे पुस्तक मी वाचून काढले आहे”. हे ऐकून मला तर आश्चर्य वाटले. नुकतेच आलेले पुस्तक साहेबांनी कधी वाचले असेल. साहेब म्हणाले “या पुस्तकाबद्दलचे परीक्षण दिल्लीत असताना एका दैनिकात वाचले. पुस्तक मागवून घेतले आणि वाचले”. पवार साहेब खूप कामात असतात. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, उद्योग, सहकार इत्यादी क्षेत्रात ते खूप व्यस्त असतात. इतक्या व्यस्त वेळेतून ते सतत वाचत असतात. माझ्या दोन ग्रंथ प्रकाशनासाठी ते आले. प्रकाशनापूर्वी त्यांनी ग्रंथ वाचून त्यांनी फोन करून सुमारे अकरा मिनिटे पुस्तकाबाबत फोनवर चर्चा केली.
तात्पर्य ..आजकाल अनेक नेते, वकील, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, अधिकारी, व्यावसायिक भेटले की सांगत असतात की “खूप वाचायची ईच्छा आहे, परंतु वेळच नाही.” त्यांनी पवार साहेबांचा वाचनाचा व्यासंग जरूर पाहावा. बाकी त्यांच्याशी राजकीय,वैचारिक मतभिन्नता असू शकते. राजकीय, वैचारिक मतभेद असणे हे लोकशाहीच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. पवार साहेब राजकीय, वैचारिक मतभेदाच्या पलीकडे पाहतात. आपल्या विरोधकाशीही अत्यंत सौजन्याने बोलणे, ही त्यांची राजकीय संस्कृती आहे. आज पवार साहेबांचा वाढदिवस.. त्यानिमित्त अशा वाचनविराला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
-डॉ. श्रीमंत कोकाटे
Discussion about this post