मायणी प्रतिनिधी
अंबवडे (ता. खटाव ) येथील भुतेश्वर विद्यामंदिराने आयोजित केलेल्या शाळा स्तरावरील विज्ञान मेळ्याला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
वेल्डिंग गन, रेन डिटेक्टर, बायोगॅस, प्रदूषण नियंत्रक , कार्बाइट गन, भूकंप नियंत्रक, थ्रीडी होलोग्राम… अशी शंभरावर नानाविध उपकरणे स्वतः तयार करीन प्रदर्शनात मांडली. मान्यवरांकडून त्याचे तोंड भरून कौतुक करण्यात आले.
यंदा होणाऱ्या ५२ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर अंबवडे (ता. खटाव ) येथील भुतेश्वर विद्यामंदिरात शाळा स्तरावरील विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. अंबवडेच्या सरपंच शोभाताई काकडे यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी खटावचे शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत सुतार, सोसायटी संचालक मनोज पवार, मुख्याध्यापक संजय जगताप, एसएमसीचे उपाध्यक्ष विश्वजीत घाडगे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विजय पवार, विज्ञान विभाग प्रमुख सुखदेव कारंडे, आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार विज्ञान विभाग प्रमुख सुखदेव कारंडे यांनी विज्ञान प्रदर्शनाचे नेटके नियोजन केले. त्यांना माधुरी जाधव, अर्चना माने, संतोष देशमुख, रामसिंग वळवी, रवींद्र पारधी या विज्ञान शिक्षकांसह दीपक कुंभार, प्रवीण बरकडे यांनी सहकार्य केले. त्या शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार, विविध वैज्ञानिक तत्वांवर आधारित शंभरावर उपकरणांची निर्मिती विद्यार्थ्यांनी केली. सुमारे दीडशे विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. इयत्ता पाचवी ते सातवी गटात ओम किरण जगताप याच्या प्रदुषण नियंत्रक उपकरणास प्रथम क्रमांक मिळाला. रेहाण इकबाल मुलाणीच्या भूकंप नियंत्रकास द्वितीय तर विराज गणेश शेटेच्या रेन डिटेक्टर ला तृतीय क्रमांक देण्यात आला. इयत्ता आठवी ते दहावी मोठ्या गटात प्राजक्ता पवार व ऋतुजा गायकवाड यांच्याथ्रीडी होलोग्राम ला प्रथम क्रमांक मिळाला. सूर्यद खिलारे व ओम दहातोंडे यांच्या कार्बाइट गन ला दुसरा क्रमांक मिळाला. तर यश बनसोडे व ओम मिठारे यांनी बनवलेल्या वेल्डिंग गन ला तृतीय क्रमांक मिळाला. दरम्यान, विद्यालयाच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यावेळी सुनीता भोसले, विजयकुमार जाधव, एस.बी. देशमुख, राजेंद्र भिसे, संजय कांबळे, पालक, शिक्षक उपस्थित होते. दरम्यान, प्रदर्शन पाहण्यासाठी ग्रामस्थ, पालक, आणि परिसरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.
Discussion about this post