






आळंदी, (दि.१४) : येथील चऱ्होली रोड,जिल्हा परिषद शाळेजवळ अक्कलकोट प्रणित ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ स्थापित आहे. याच मठात येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शनिवार, (दि.१४)डिसें, २०२४ रोजी सायं. ठीक – ६:३० वाजता श्री दत्त जयंती सोहळा मोठ्या आनंद व उत्साहाने, निष्ठा व भक्तीभावाने समस्त भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
श्री दत्तात्रय जन्मोत्सवासाठी श्री स्वामी समर्थ मठात आकर्षक रांगोळी, विविध फुलांच्या माळा,तोरण, संपूर्ण मठात आकर्षक रंगेबेरंगी विद्युत रोषणाई केली होती. मठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर खूप मोठी दत्तमूर्ती विविध रंगांनी परिपूर्ण अशी सुंदर, सुरेख आकर्षक रांगोळी भाविकांचे लक्ष व मन वेधून घेत होती.अतिशय सुंदर अशी कलाकृती हातांनी कलाकारांनी तयार केली होती. त्या रांगोळी भोवती मातीच्या पणत्या प्रज्वलित केल्याने,लावल्याने मठ व रांगोळी रात्रीच्या प्रकाशात अधिकच सुंदर दिसत होते. संपूर्ण मठ परिसरात दत्त जयंती निमित्त आकर्षक पणत्यांची आरास होती. दत्त जयंती निमित्त दत्तांचा पाळणा देखील आकर्षक रंगीबेरंगी सुवासिक फुलांनी सजवलेला होता.
श्री दत्त जयंती निमित्त या मठात श्री स्वामी समर्थ सेवेकरी परिवारातर्फे गुरुचरित्र पारायण सप्ताह व विविध अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
शनिवार दि. १४ डिसें रोजी सकाळी गुरुचरित्र दत्त पारायण समाप्ती व सायंकाळी ठीक ६:३० ला दत्त जन्मोत्सव सोहळा,महाआरती करण्यात आली. “अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त”, “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या” एकच मोठ्या जयघोषात दत्त जयंती साजरी करण्यात आली.दत्त जयंती निमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पाणी व प्रसादाची सोय करण्यात आली होती. या दत्त जयंती सोहळ्यासाठी मठ परिसरातील दत्त भक्तगण व श्री स्वामी समर्थ सेवेकरी दर्शन व महाप्रसादासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दत्त दर्शनासाठी लहान मुले-मुली,महिला– पुरुष या सर्वच वयोगटातील लोकांची संख्या फार मोठी होती. जास्तीत – जास्त संख्येने भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. शनिवारी सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांबच –लांब रांगा होत्या. संपूर्ण दिवसभर मठात विविध अध्यात्मिक कार्यक्रम आरत्या, स्तोत्र,मंत्र, दत्त नाम जप, पठण झाले. संपूर्ण दिवसभर ते रात्री १० वा.पर्यंत मठात भाविकांची ये–जा सुरूच होती..
Discussion about this post