नारायणगाव : वडगाव कांदळी (तालुका जुन्नर) येथील राखीव वन कक्ष क्रं ४४ मध्ये अवैधरित्या पोकलैंड मशीनच्या सहाय्याने विहीर खोदून वन हद्दीमध्ये अतिक्रमण करणाऱ्या एक जणाला अटक करण्यात वन विभागाला यश आले आहे या आरोपीला जुन्नर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान २९ नोव्हेंबर २०२४ रोजी वडगाव कांदळी (तालुका जुन्नर) येथील राखीव वन कक्ष क्रं ४४ मध्ये अवैधरित्या पोकलैंड मशीनच्या सहाय्याने विहीर खोदण्याचे काम चालु असल्याची माहिती वनविभागाला समजली त्यानुसार वनपरिक्षेत्र ओतूर विभागातील टीमने घटनास्थळी जावुन अवैध काम थांबवण्याची कारवाई करण्यास गेले असता तेथे मोठ्या संख्येत असलेल्या जमावाने त्यास प्रतिबंध करून अटकाव केल्याने कारवाई करता आली नव्हती. त्याअनुषंगाने वनविभाग सदर पोकलैंड मशीन चा मालक/आरोपीच्या शोधात होते.
दरम्यान सदर पोकलैंड मशीन हे राजाराम ज्ञानदेव फापाळे रा. बेलापुर ता. अकोले जि. अ.नगर याने इतर आरोपींसोबत संगनमताने पोकलैंड मशीन सह वडगाव कांदळी येथील शासकीय राखीव वनात जावुन वनाच्या हद्दी खुणा नष्ट करून तेथील झाडे झुडपे साफ सफाई करून वनक्षेत्रात विहीर खोदल्याचे निदर्शनास आल्याने त्याच्या विरुध्द भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६(१) ए.डी.ई.एफ.जी.एच, कलम ६३ सी अन्वये गुन्हा नोंद करण्यात येवुन त्यास दि १६/१२/२०२४. रोजी अटक केली.
या आरोपीस आज दि १७/१२/२०२४ रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जुन्नर यांच्या न्यायालयात हजर केले असता शासनाच्या वतीने सहा. सरकारी वकील श्रीमती अवचर व वनपरिक्षेत्र अधिकारी लड्डू ठोकळ यांनी केला. न्यायालयाने सदर गुन्हयात वापरण्यात आलेले पोकलैंड मशीन तसेच सहभागी इतर आरोपींचा शोध घेवून तपास करण्यासाठी आरोपीस ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी लहु ठोकळ, म्हणाले म्हणाले की, शासकीय राखीव वनात अपप्रवेश करणे वनांच्या हद्दी खुणा नष्ट करणे, राखीव वनात वृक्षतोड करणे तसेच अवैध उत्खनन व खोदाई करणे भारतीय वनअधिनियम १९२७ च्या तरतुदींचे उल्लंघन असुन अशा कृत्याकरिता जास्तीत जास्त २ वर्ष इतक्या शिक्षेची तसेच रू. ५०००/- इतक्या दंडाची तरतुद करण्यात आली असल्याने अशा अवैध कृत्यासाठी वनवभिागामार्फत कठोर कारवाई करण्यात येईल.
ही कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते वनविभाग जुन्नर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे , वनक्षेत्रपाल लहु ठोकळ, परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी निकीता बोटकर, वनपाल एम. जे. काळे यांनी वनपरिक्षेत्र ओतूर टिम समवेत पार पाडली असुन पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी लहु ठोकळ करीत आहेत.
Discussion about this post