सावंतवाडी, ता. २८: नागपूर-मडगाव एक्सप्रेसला सावंतवाडीत थांबा
मंजूर करण्यात आला आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून याबाबत खासदार नारायण राणे यांचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. याबाबत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने श्री. राणे यांचे आभार मानले आहेत.
गेले काही वर्षे कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी ही सावंतवाडी स्थानकात असणाऱ्या सुविधांसंदर्भात वेळोवेळी संबंधित प्रशासनाकडे दाद मागत होती. नागपूर मडगाव एक्स्प्रेस सावंतवाडी स्थानकात थांबावी यासाठी अथक प्रयत्न करत होती. ही गाडी काही वर्षापूर्वी या स्थानकात थांबत होती. सावंतवाडी स्थानकातून अपेक्षित प्रवासी संख्या आणि उत्पन्न या गाडीतून मिळत असताना देखील या स्थानकातून या गाडीचा थांबा रद्द करण्यात आला होता. त्यानंतर प्रवासी संघटनेचा सातत्याने याबाबत पाठपुरावा सुरू होता.
हा थांबा मंजूर करण्यासाठी सहकार्य करणारे खासदार नारायण राणे तसेच सावंतवाडी चे आमदार दीपक केसरकर, कोकण रेल्वे महामंडळाचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक शैलेश बापट यांचे संघटने तर्फे अध्यक्ष अॅड संदीप निंबाळकर, मिहिर मठकर, विनोद नाईक, भूषण बांदिवडेकर, सागर तळवडेकर, सुभाष शिरसाट यांनी आभार मानले आहेत.
Discussion about this post