छत्रपती संभाजीनगरात सध्या ४२ ठिकाणी सिग्नल आहेत. मात्र त्यातील मोजकेच उपयोगात असून, बहुतांश सिग्नल बंदच राहतात. काही ठिकाणी किती वेळ थांबायचे कळत नाही. त्यामुळे वाहनांचे इंजिन सुरूच असतात. परिणामी प्रदूषणात वाढ होते. महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक सिग्नल बसविण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात १४ सिग्नल बसवले आहेत.
गजानन महाराज मंदिर चौकातील स्मार्ट सिग्नलची नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी चाचणीही घेण्यात आली. राष्ट्रीय शुद्ध हवा योजनेच्या निधीतून ९ ठिकाणी तर मनपा निधीतून ५ ठिकाणी अशा १४ ठिकाणी स्मार्ट सिग्नल बसविले आहेत. विशेष म्हणजे, उद्धवराव पाटील चौक, धूत हॉस्पिटल येथील टी पॉइंट आणि केम्ब्रिज चौक या ठिकाणी प्रथमच सिग्नल बसविले आहेत. वाहतुकीला शिस्त लागण्यासोबतच सिग्नलवर प्रदूषण कमी व्हावे या दृष्टीने प्रत्येक चौकाचा अभ्यास यासाठी करण्यात आला आहे.
Discussion about this post