शैलेश मोटघरे
गोंडऊमरी/रेल्वे: शाळांतील स्नेहसंमेलन म्हटले की विद्यार्थ्यांच्या उत्साहाला अन् आनंदाला उधाण येते. कला, सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञानाचे प्रयोग, खेळ अशा यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना बहर येतो. गोंडऊमरी परिसरासह तालुक्यातील देखील शाळांमध्ये एकापाठोपाठ सध्या स्नेहसंमेलनाची धामधूम सुरू झाली आहे.
शाळांच्या सभागृहात ताला-सुरांचे आवाज ऐकू येवू लागले आहेत. प्ले ग्रुप, नर्सरी, पहिली, दुसरीतील विद्यार्थीही चित्रपट गीतांवर ताल धरत आहेत. सध्या विविध शाळा, विद्यालयांनी
स्नेहसंमेलनाचा ताल धरला असून स्नेहसंमेलनाच्या तयारीमुळे विद्यार्थी वेगळ्याच विश्वात रममाण झाले आहेत.ग्रामीण परिसरातील अनेक शाळा व विद्यालयांत विद्यार्थ्यांची गाणी, नाटके, समुहनृत्य, सोलो नृत्याचे तालिम सुरू असल्याचे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. काही शाळांची तर प्रत्यक्ष स्नेहसंमेलनेही धडाक्यात पार पडली आहेत. काही शाळांमध्ये तयारी सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कलागुणांना वाव मिळत आहे. स्नेहसंमेलनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून सादर केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाची तयारी उत्तम व्हावी यासाठी शिक्षकही आपल्या जीवाचे रान करताना दिसत आहेत. भरभक्कम तयारी केल्यानंतर मुले जेव्हा रंगमंचावर उभी राहतात तेव्हा पालकांसोबत शिक्षकही भारावून जातात. स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांसाठीही आनंदाची बाब झाली आहे. त्यामुळेच सध्या अनेक शाळात या स्नेहसंमेलनाची तयारी सुरू आहे.
पारितोषिक वितरण आणि बक्षिसांची लयलूट
स्नेहसंमेलन म्हटले की, सादरीकरणाची चढाओढ असते. स्नेहसंमेलनानंतर होणाऱ्या पारितोषिक वितरणामध्ये बक्षिसांची लयलूट असते. याचवेळी पाठीवर शाबासकीची थाप पडते. स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थी आपले कलागुण सादर करतात. त्यामुळे अगदी बालवाडी चालवणाऱ्या संस्थाही स्नेहसंमेलनाचे आयोजन करतात.
ड्रेपरीसाठी पालकांची धावाधाव
स्नेहसंमेलनासाठी लागणार्या नृत्य व नाटकासाठी शहरातील ड्रेपरीवाल्यांकडे पालकांची धावाधाव सुरु आहे. ऐतिहासिक नाटके व नृत्य असल्यास अशा हेपरीला जास्त मागणी असते. त्यामुळे मुलांना स्नेहसंमेलनासाठी लागणारी ड्रेपरी कोणत्या दुकानात मिळेल यासाठी पालकांची धावाधाव सुरु आहे. पालकही हौशी असल्याने मुलांच्या स्नेहसंमेलनासाठी कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू न देता ड्रेपरी व ज्वेलरी भाड्याने नाही मिळाली तर विकत घेण्याकडे देखील पालकांचा कल आहे.
Discussion about this post