शासकीय योजनांच्या लाभासाठी नोंदणीचे आवाहन
शैलेश मोटघरे
गोंडऊमरी/रेल्वे: पीकविमा, पीककर्ज, नैसर्गिक आपत्तीमध्ये शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी येत्या 15 जानेवारीच्या मुदतीमध्ये रब्बी हंगामाची ई-पीक पाहणी करुन घ्यावी असे आवाहन गोंडऊमरी चे तलाठी एस.डी.बारबुध्दे यांनी केले आहे.
याबाबत माहिती देताना तलाठी श्री.बारबुध्दे यांनी सांगितले, की कृषी व पशुसवंर्धन, दुग्धव्यवसाय, विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शासन निर्णया नुसार शेतकऱ्यांना विविध योजना अंतर्गत लाभ देण्याकरिता अॅग्रिस्टक योजनेची अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले आहे. सदर योजना ही पीककर्ज, विमा, पीएम किसान योजना, किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्टक्चर फंड व शेती विकासाकरिता इतर कर्ज, पीककर्ज, पिकविमा, नैसर्गिक आपत्ती अंतर्गत देय नुकसान भरपाई, किमान आधारभूत किंमतीवर खरेदीमध्ये ऑनलाइन नोंदणी या योजनेचा लाभ घेण्याकरिता सहाय्यभूत
करणार आहे.
राज्यात एक डिसेंबरपासून रब्बी हंगाम सुरु झाला आहे. शेतकऱ्यांना यापूर्वी पिक पाहणीसाठी ई-पिक पाहणी मोबाइल अॅप उपलब्ध होते. परंतु केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे यामध्ये तांत्रिक बदल करत डिजिटल क्रॉपसर्वे (डीसीएस) मोबाइल अॅपच्या माध्यामातून संपूर्ण राज्यात ई-पीक पाहणी होणार आहे. शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी करण्यासाठी 1 डिसेंबर ते 15 जानेवारी 2025 ही मुदत असून सहाय्यक स्तरावर ई- पीक पाहणी करण्यासाठी ही मुदत आहे.
शेतकरी स्तरावरून मोबाईल अॅप द्वारे पीक पाहणी नोंद करण्यात येऊन शेतकरी स्तरावरील कालावधी संपल्यावर सहाय्यकामार्फत उर्वरित शेतकऱ्याची पिक पाहणी अँपद्वारे नोंदविण्यात येते. शेतकऱ्याच्या पीक पाहणी मदतीसाठी हंगाम सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून सहाय्यक उपलब्ध आहे. डिजिटल क्रॉप सर्वे (डीसीएस) मध्ये गटाच्या हद्दीवर आधारित जिओ फेन्सिग बंधनकारक करण्यात आलेली आहे. जोपर्यंत संबंधित खातेदार सहाय्यक निवडलेल्या गटात जाऊन पीक पाहणी करत नाही, तोपर्यंत पिकाचे छायाचित्र काढता येत नाही. पीक पाहणी अपलोड करता येत नाही. तसेच, मोबाईल मध्ये जिओ फेन्सिंग असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या गटामध्ये जाणे अनिवार्य आहे. तसेच पिकांचे फोटो घेऊन अपलोड करणे बंधनकारक आहे, असे तलाठी एस.डी.बारबुध्दे यांनी सांगितले.
Discussion about this post