

प्रशांत पाटील संपादक अहिल्यानगर..
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत अहिल्यानगर येथून ७५० यात्रेकरूंना घेऊन जाणारी जिल्ह्यातील पहिली रेल्वे अयोध्येकडे रवाना झाली. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.
कार्यक्रमास महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे, समाजकल्याण सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार, समाजकल्याण अधिकारी देविदास कोकाटे, प्रभारी रेल्वे स्टेशन व्यवस्थापक एस.जी. महाजन, आय.आर.सी.टी.सी.चे विभागीय व्यवस्थापक गजराज सोन्नार, समाजकल्याण निरीक्षक संदीप फुंदे आदी उपस्थित होते.
रेल्वेच्या डब्यांमध्ये बसल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. काही ज्येष्ठ नागरिकांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्यासारख्या वृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी अयोध्या दर्शन हे स्वप्नच होते. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमुळे आमच्या स्वप्नांची पूर्तता होत आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या उपक्रमामुळे अनेक भाविकांना अयोध्येला जाण्याची संधी मिळाल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाबद्दल शासनाचे आभार व्यक्त केले.
अयोध्येला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर दाखल झालेल्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांचे प्रशासनाच्यावतीने स्वागत करण्यात आले. प्रत्येक यात्रेकरूला उपरणे, माळ घालून यात्रेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
जिल्ह्यातील १४ तालुक्यातून तीर्थदर्शनासाठी निघालेल्या यात्रेकरूंची त्यांच्या गावपासून ते रेल्वे स्टेशनपर्यंत आणण्याची चोख व्यवस्था प्रशासनाने केली होती. बसेसद्वारे त्यांच्या गावापासून यात्रेकरूंना स्टेशनपर्यंत आणण्यात आले . यात्रेकरूंसाठी नाश्त्याची सोयही स्टेशनवर करण्यात आली होती. रेल्वेताही आरोग्य व अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
अहिल्यानगर रेल्वेस्थानकातील क्रमांक २ च्या फलाटावरुन ७५० यात्रेकरू, २० स्वयंसेवक व १३ जणांचे वैद्यकीय पथक विशेष रेल्वेने अयोध्येकडे मार्गस्थ झाले..
Discussion about this post