भोकरदन प्रतिनिधी रमेश जगताप (9764290358)| भोकरदन तालुक्यात विनापरवाना आणि अपुऱ्या पात्रतेने अनेकजण दवाखाने चालवत असून, आरोग्य विभागाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट – आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
तालुक्यातील अनेक डॉक्टर मेडिकल कौन्सिलची अधिकृत परवानगी न घेताच दवाखाने सुरू करत आहेत. काहींनी केवळ नॅचरोपॅथी किंवा इलेक्ट्रो कोर्स करून स्वतःला डॉक्टर घोषित केले आहे. याचा परिणाम गरीब आणि असहाय्य रुग्णांवर होत असून, त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
चुकीच्या उपचारामुळे अपंगत्व, जीवितहानीचे प्रकार वाढले
गेल्या काही वर्षांत या बोगस डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारांमुळे काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. असे असूनही जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
कमिशनखोरीचा सुळसुळाट – गंभीर आजारांवर गावातच उपचार
हे बोगस डॉक्टर गंभीर आजार असलेल्या रुग्णांना दिशाभूल करून गावातच उपचार करतात. लक्षणे गंभीर होताच ते आपल्या ओळखीच्या डॉक्टरांकडे पाठवतात आणि त्यावर मोठ्या प्रमाणात कमिशन घेतात. परिणामी, रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळत नाहीत आणि जीव धोक्यात येतो.
शोध समिती कागदावरच – कारवाई ठप्प
तालुक्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी गटविकास अधिकारी आणि आरोग्य तालुकाधिकारी यांच्या समितीची स्थापना करण्यात आली होती. मात्र, ही समिती कागदावरच राहिली असून प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याने जनतेत नाराजी आहे.
आरोग्य मंत्र्यांचे लक्ष लागले – ठोस कारवाई होणार का?
आरोग्य विभागाच्या या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये संताप असून, राज्याचे आरोग्यमंत्री या बोगस डॉक्टरांवर कारवाई करतील का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आणि नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे
Discussion about this post