तुमसर: शास्त्री नगर परिसरात विजचोरी करताना एकाला रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध भारतीय विद्युत कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म.रा.वि.वि. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विजचोरी मोहीम राबवताना ही कारवाई केली.
विजचोरी करताना आढळला आरोपी :
या प्रकरणात समीर जलील शेख (वय अंदाजे 35 वर्षे, रा. शास्त्री नगर, तुमसर) याने सौ. शारदाबाई केवोटे यांच्या नावाने असलेल्या वीजमीटरवर बेकायदेशीर वायर टाकून थेट वीजपुरवठा घेतल्याचे आढळून आले. आरोपीने मीटरच्या इनकमिंग वायरच्या लाल रंगाच्या फेज वायरला लाल रंगाची वायर आणि न्यूट्रल वायरला पिवळ्या रंगाची वायर टाकून थेट वीजपुरवठा मिळवला आणि घरगुती उपकरणे सुरू केली होती.
वीज वितरण कंपनीचे आर्थिक नुकसान :
ही घटना 11 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:20 वाजता उघडकीस आली होती. या विजचोरीमुळे म.रा.वि.वि. कंपनीचे 2,412 युनिट वीज (मूल्य 13,296.10 रुपये) नुकसान झाले.
गुन्हा नोंदवून तपास सुरू :
त्यानुसार 28 फेब्रुवारी रोजी तुमसर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. सहाय्यक अभियंता नंदकिशोर लक्ष्मण सावलकर (वय 40 वर्षे, म.रा.वि.वि. कंपनी, वितरण केंद्र तुमसर शहर 2, उपविभाग तुमसर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास मपोहवा. कल्पमा बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा. ज्ञानेश्वर टेकाडे करीत आहेत..
Discussion about this post