

तुमसर :
तुमसर नगर परिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या कार्यशैलीमुळे शहराच्या विकासकामांना अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांना रविवारी निवेदन सादर केले. मुख्याधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून इतरत्र बदली करावी तसेच कार्यक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष देवचंद ठाकरे, शहर अध्यक्ष योगेश सिंगनजुडे, अल्पसंख्याक अध्यक्ष यासिन छवारे, प्रदेश युवक सचिव प्रदीप भरणेकर, महिला अध्यक्ष पमा ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष सरोज भुरे, तसेच विजया चोपकर, जयश्री गभने, नानू परमार, रिंकू ठाकूर, अविनाश पटले, मुकेश मलेवार, प्रवीण भुरे, सुमीत लोखंडे आणि कामेश बोपचे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या.
मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या प्रशासनातील अनियमिततेबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शासनाच्या विविध योजनांसाठी मंजूर निधी वेळेत वापरण्यात अपयश आल्याने विकासकामे ठप्प झाली आहेत. तसेच शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, स्वतःच्या थकीत वेतनाच्या नावाखाली ८ लाख रुपये मंजूर करून घेतल्याचा आरोप आहे.
काही विशिष्ट गटांच्या प्रभावाखाली प्रशासन चालवल्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मुख्याधिकारी जनतेशी उद्धट वर्तन करतात, लोकप्रतिनिधींशी गैरवर्तन करतात आणि पारदर्शकतेला बाधा आणतात. नागरी सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने रस्ते, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत गरजांकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले आहे.
त्यामुळे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांना तात्काळ निलंबित करून सक्षम व कार्यक्षम अधिकारी नियुक्त करावा. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
यासंदर्भात खासदार प्रफुल्ल पटेल यांनी लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
तुमसर नगर परिषदेच्या निष्क्रिय आणि पक्षपाती प्रशासनामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहराच्या विकासाला खीळ बसली असून नागरी समस्यांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने जनतेमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे..
Discussion about this post