


शिरूर तालुका प्रतिनिधी:-
पुणे – अहिल्यानगर रस्त्यावर बोऱ्हाडे मळा येथे अवैध दारूची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी काल गस्ती दरम्यान पकडला असून या ट्रकमधून सुमारे साठ लाख रूपये किंमतीचे दारूच्या बाटल्यांचे एक हजारावर बॉक्स व इतर साहित्य जप्त केले. पुणे अहिल्यानगर रस्त्यावर बोऱ्हाडे मळा (ता. शिरूर) येथे रात्री सात च्या सुमारास शिरूर पोलिसांनी ही धाडसी कारवाई केली. बेकायदा दारूची वाहतूक करणारा ट्रक देखील (क्र. एमएच ४८ सीबी ३६०५) पोलिसांनी जप्त केला असून, ट्रक चालक मोहम्मद इम्रान मोहम्मद सलिम शेख (वय ३७, रा. घाटकोपर, मुंबई) याला ताब्यात घेतले आहे. जप्त केलेल्या ट्रकमधे रॉयल ब्लू या ब्रॅण्डचे प्रत्येकी १८० मिलि लिटर दारू असलेले सुमारे एक हजार पन्नास बॉक्स होते व ते गोवा येथून नाशिक येथे नेले जात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झाली. या दारूची किंमत साठ लाख ४८ हजार रूपये व जप्त केलेल्या ट्रकची अंदाजे किंमत १५ लाख रूपये असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली. शिरूर पोलिस ठाण्याच्या वाहतूक विभागातील शेखर झाडबुके व अप्पासाहेब कदम हे रात्री सातच्या सुमारास पुणे – अहिल्यानगर मार्गावर दूचाकी हून गस्त घालत असताना न्हावरे फाटा येथे न्हावरे बाजू कडून आलेला ट्रक अहिल्यानगरच्या दिशेने गेला असता ट्रकमधून दारूचा वास आला. त्याचबरोबर पोलिसांना पाहून ट्रक चालकाची हालचालही संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी बोऱ्हाडे मळ्याजवळ ट्रक थांबविला. चालका कडे चौकशी केली असता ट्रकमध्ये भंगार साहित्य असल्याचे त्याने सांगितले. शिवाय त्याच्या कडील माल वाहतूकीच्या चिठ्ठीतही भंगार साहित्य असाच उल्लेख होता. मात्र दारूचा वास आल्याने अप्पासाहेब कदम यांनी मागील बाजू उघडून ट्रकमध्ये वर चढून पाहिले असता मागील बाजूस भंगार व फाटके तुटके कपडे आढळले. मात्र, संशय बळावल्याने कदम यांनी ट्रक मधे आणखी आत जावून पाहिले असता आतील बाजूस दारूच्या बाटल्यांचे बॉक्स आढळून आले. याबाबत माहिती मिळताच पोलिस निरीक्षक केंजळे, उपनिरीक्षक शुभम चव्हाण, वाहतूक पोलिस भाग्यश्री जाधव, नीरज पिसाळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ट्रक पोलिस ठाण्यात आणला. ट्रकसह सुमारे साठ लाख रूपयांचा दारू साठा जप्त करण्यात आला असून, रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. ट्रक चालकाकडे पोलिसांनी माल वाहतूक परवान्याची व कुठला माल वाहून नेला जात आहे, याची विचारणा करताच तो गडबडला. उलट – सुलट उत्तरे देऊ लागल्याने व ट्रकमधून दारूचा काहीसा वास आल्याने वाहतूक विभागातील अप्पासाहेब कदम यांनी थेट ट्रकवर चढून मागील बाजू उघडून खात्री केली असता सुमारे पन्नास हजार चारशे दारूच्या बाटल्या बॉक्समधून आढळून आल्या. ही बेकायदा दारू जप्त केली असून, ती नेमकी कुठे नेली जात होती, याबाबत तपास चालू आहे. आर्मीतून पोलिस दलात आलेल्या कदम यांची या कारवाईतील भूमिका महत्वाची ठरली.

Discussion about this post