आज महाराष्ट्रासह कर्नाटकातील काही प्रांतामध्ये होळी चा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा होणार आहे. लहानांपासून थोरांपर्यंत आज या दिवशी घरोघरी गोड पुरणपोळीचा नैवद्य केला जातो तर घरासमोर होळी पेटवली जाते वाईट शक्ती किंवा वाईट विचारांचा नाश व्हावा या उद्देशाने आज होळी पेटवली जाते. तसेच उद्या धूलिवंदन हाही एक पारंपरिक रंगोत्सव रंगणार आहे. होळी सणाने आज भारतात वसंत ऋतूचे आगमन, तर हिवाळ्याचा शेवट आणि प्रेमाचा बहर म्हणून साजरी होते.ह्या उत्सवाला “होलिकादहन” किंवा “होळी”, “शिमगा”, “हुताशनी महोत्सव”, फाग, फागुन “दोलायात्रा”, “कामदहन” अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात शिमगो म्हणतात. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला “फाल्गुनोत्सव”,आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त “वसंतागमनोत्सव” किंवा “वसंतोत्सव” असेही म्हणण्यात येते. देशीनाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने या सणालाला सुग्रीष्मक असे नाव दिले आहे. यातूनच ‘शिमगा’ असा अपभ्रंश तयार झाला असावा असे मानले जाते. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळतात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती ‘बोंबा’ मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे. होळीनंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला ‘धुळवड’ असेही म्हणतात. या दिवशी होळीची रक्षा अंगाला फासली जाते किंवा ओल्या मातीत लोळण घेतली जाते. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते.भारतातील शेतकरी वर्गात होळी या सणाचे खास महत्त्व आहे. पौराणिक इतिहास पाहता या सणाचे आणि कृष्ण-बलराम यांचे नाते दिसून येते. होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात. यादिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे.
Discussion about this post