दि. २७ शहापूरच्या अजनुप ग्रामपंचायतीतील १९ पाड्यांत दारूबंदीचा ठराव घेण्यात आला आहे. या ठरावाला महिलांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला आहे. घरगुती भांडणे, नशेच्या आहारी गेलेली तरुण पिढी आणि गावातील तंटे याला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीने दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. या बंदीमुळे दारू विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येऊ नये याकरिता त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी ग्रामपंचायतीकडून स्पष्ट करण्यात आले.
अजनुप ग्रामपंचायतीतील १९ आदिवासी पाडे असून ५ हजार इतकी लोकसंख्या आहे. मात्र या पाड्यांवर ठिकठिकाणी बेकायदा आणि गावठी दारूचे अड्डे सर्रासपणे सुरू आहेत. या गावठी दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून नशेच्या आहारी गेल्यामुळे गावातील भांडणे तसेच हिंसाचाराचे प्रमाण वाढले आहे. त्यातच गावातील तरुण पिढीदेखील दारूच्या आहारी गेल्याने त्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. यावर चाप बसवण्यासाठी अजनुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजय कथोरे यांनी पुढाकार घेऊन पाड्यांवर दारूबंदीचा ठराव केला आहे. यावेळी ग्रामविकास अधिकारी एम. बी. परमार, सदस्य अनंता वारे, योगिनी झारगडे, भारती सारक्ते आदी उपस्थित होते.
अजनुप ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावाची दखल घेऊन दारूबंदीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षकांसह संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार आहे.
मंगल परमार, ग्रामविकास अधिकारी
गोरगरीब आदिवासी कुटुंबीयांची दारूमुळे वाताहत झाल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक संसार उद्ध्वस्त होऊन मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. गावपाड्यातील दारू विक्री बंद करून येथील तरुण पिढीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा प्रयत्न आहे.
अजय कथोरे, उपसरपंच,
अजनुप ग्रामपंचायत
प्रतिनिधी: विजय गगे ९२०९५६३८६४
Discussion about this post