उदगीर (प्रतिनिधी) : यात दूध डेरी आणि दूध भुकटी प्रकल्पात च्या भंगार विक्रीची निविदा काढण्यात आली असून सदरील निविदा “शारदा टेक्नो स्पेशलिटीज प्रा. लि. कोल्हापूर यांना मंजूर झाली आहे.
एक कोटी एक लाख 14 हजार रुपयाची निविदा मंजूर करण्यात आल्याने, सदरील कंपनीचे प्रतिनिधी उदगीर येथे येऊन शासकीय दूध भुकटी प्रकल्पाची मशिनरी आणि इतर साहित्य घेऊन जाण्यासाठी आले होते. सदरील माहिती शासकीय दूध योजना पुनर्जीवन समितीच्या पदाधिकाऱ्यांना समजल्यानंतर तातडीने सर्व प्रतिनिधींनी आणि उदगीरच्या हितीचिंतकांनी शासकीय दूध योजना येथे जाऊन संबंधित कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यापूर्वी अशाच आशयाचे निवेदन उपजिल्हाधिकारी आणि शासकीय दूध योजनेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेले आहे. त्याची प्रत या संबंधितांना देऊन उदगीर येथून प्रकल्पाची मशनरी तर सोडाच भंगाराचा एक कणही येथून हलू देणार नाही अशी आक्रमक भूमिका या समितीच्या सदस्यांनी घेतली आहे.
उदगीर पंचक्रोशीच्या विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी ही शासकीय दूध योजना सुरू केली. त्यानंतर या योजनेची भरभराट होऊ लागल्यानंतर सन 1979 मध्ये दूध भुकटी प्रकल्प सुरू झाला. तो प्रकल्प 2002 पर्यंत सुरळीत सुरू होता, मात्र नंतर घरघर लागली आणि तो बंद पडला. हा प्रकल्प सुरू व्हावा म्हणून पुन्हा नव्या जोमाने नोव्हेंबर 2008 मध्ये तत्कालीन आमदार स्व.चंद्रशेखर भोसले यांनी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख यांच्याकडे पाठपुरावा आणि आंदोलन करून पुन्हा या प्रकल्पासाठी निधी मंजूर करून आणला, आणि प्रकल्प सुरू केला.
मात्र तत्कालीन काही अधिकाऱ्यांना हा प्रकल्प नको वाटत होता. परिणामत: हा प्रकल्प पुन्हा बंद पडला की पाडला गेला? या संदर्भात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात. तसे असले तरी तो प्रकल्प बंद पडल्यानंतर पुन्हा तो प्रकल्प सुरू व्हावा अशा पद्धतीची हालचाल फारशा ताकतीने कोणीही केली. नाही.
Discussion about this post