🔸बडेवाडी येथे जयंती निमित्त आरोग्य शिबिर संपन्न
दिंद्रुड / प्रतिनिधी
श्री राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जयंतीच्या निमित्ताने माजलगाव तालुक्यातील बडेवाडी येथे कीर्तन व सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने मंगळवारी करण्यात आले होते. पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी कीर्तना श्रवण करण्या सोबतच आरोग्य शिबिर व महाप्रसादाचा लाभ घेतला.
संत भगवान बाबांनी समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी आपला देह झिजवला असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांनी केले.
ह.भ.प.प्रकाश महाराज साठे यांनी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या आध्यात्मिक जिवनाचा आलेख कीर्तनाद्वारे मांडला. यावेळी जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, रविराज बडे, जैतापूरचे सरपंच भागवत दराडे, देवदूत प्रतिष्ठानचे अध्यक्ष बंडू खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिवनात संतांच्या अभंग रुपी ज्ञानामुळे सुख, शांती व समाधान लाभते. संत वचनाने मानवी जीवनात ज्ञानाची भर पडत असल्याचे साठे महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून प्रतिपादित केले.
तुम्ही संत मायबाप कृपावंत!
काय मी पतीत कीर्ती वाणु!!
या अभंगाद्वारे प्रबोधन करताना ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या अध्यात्मिक कारकिर्दीचा त्यांनी उहापोह केला. साधुसंतांनी माणसाच्या जीवनात अध्यात्म व नामस्मरणाचे महत्त्व काय असते? हे आपल्या वाणी व अभंगातून विशद करून ठेवले आहे. त्यामुळेच वर्तमान व भविष्य काळात माणुसकी टिकून असल्याचे महाराजांनी सांगितले.
राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जयंतीनिमित्त बीड येथील हाडरोग तज्ञ डॉ गणेश केदार यांनी येथील आबाल वृद्धांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार केले. बडेवाडी परिसरातील शेकडो नागरिकांनी कीर्तन श्रवण व सर्व रोग निदान शिबिराचा लाभ घेतला. विराट मुंडे, विठ्ठल बडे, लहू बडे, बंडू बडे, रामहरी तिडके, ज्ञानेश्वर बडे, भरत बडे, लक्ष्मण बडे यांच्यासह सर्व बडेवाडी ग्रामस्थांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते.
Discussion about this post