साडेसतरा हजार रुपयांचे साहित्य नष्ट; तिघांवर गुन्हे दाखल
श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी – ):
माहूर तालुक्यात हातभट्टी दारू निर्मितीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाच दिवशी तीन गावांत धाडी टाकून सुमारे १७ हजार ५०० रुपयांचे दारू बनविण्याचे साहित्य नष्ट केले. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यात काही ठिकाणी हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी स्वतः पथकासह कारवाई करत इवळेश्वर येथील नाल्यात धाड टाकली. येथे सुमारे ५० लिटर दारू तयार करण्यासाठीचे रसायन जप्त करून नष्ट करण्यात आले.
तसेच कसार पेठ येथे २०० लिटर आणि वानोळा येथे १०० लिटर मोहफुलाचे रसायन व इतर साहित्य नष्ट करण्यात आले. एकूण १७ हजार ५०० रुपयांचे साहित्य नष्ट करून संबंधित तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्यासह पोहेका प्रकाश गेडाम, गजानन चौधरी, पो.का. पवन राऊत, पिठलेवाड, रणमले, राठोड यांनी सहभाग घेतला. ठाणे अमलदार सौ. पुष्पा पुसनाके यांनी पुढील कायदेशीर कार्यवाही केली.
या धडक कारवाईमुळे तालुक्यात हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्यांत घबराट पसरली असून पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.










