चौथे परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
अमरावती : प्रतिनिधी
शब्दास्त्र विचार मंच आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथे एकदिवसीय परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन, भीमटेकडी, अमरावती येथे उत्साहात संपन्न झाले. उद्घाटन, गझल मुशायरा, परिसंवाद आणि परिवर्तनवादी आंबेडकरी कवी संमेलनामुळे हा साहित्य सोहळा विशेष गाजला.
संमेलनाध्यक्ष म्हणून बोलताना आंबेडकरी साहित्यिक प्रा. डॉ. अनंता सूर यांनी “बाबासाहेब हे केवळ नाव नसून समग्र परिवर्तनाचा विचार आहेत,” असे प्रतिपादन केले. भारतीय संविधानामुळे सर्वसामान्यांना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची जाणीव झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित, उपेक्षित समाजासाठी सामाजिक स्वातंत्र्याचा लढा उभारला. मात्र आज पुन्हा समाजाला गुलामीकडे नेण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे विचार, साहित्य आणि सामाजिक चळवळी अधिक बळकट करण्याची गरज आहे.”
या संमेलनाच्या उद्घाटक सुषमा पाखरे यांनी साहित्य हे मन, मेंदू आणि मनगट बळकट करणारे माध्यम असल्याचे सांगत तरुण पिढी साहित्याकडे वळण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे डॉ. वसंत शेंडे म्हणाले, “साहित्य नैतिकता आणि ज्ञान दोन्ही देते. साहित्य संमेलनातून नव्या पिढीची जडणघडण होत असते.”
डॉ. रविकांत महिंदकर यांनी डिजिटल युगात वाचन संस्कृती कमी होत असल्याची खंत व्यक्त करत विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचनाची आवड निर्माण करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
प्रा. मुकुंद भारसाकळे यांनी बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरी विचार उपेक्षित समाजाच्या उन्नतीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले, तर प्रा. अरुण बुंदेले यांनी आंबेडकरी साहित्य हे सामाजिक विषमतेविरुद्धचा विद्रोह असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे आदींच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी गुणवंत श्रोत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या साहित्य संमेलनाला विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक, अभ्यासक आणि मोठ्या संख्येने आंबेडकरी समाजबांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण कांबळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय दिलीप शापामोहन यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. देवानंद पाटील यांनी केले, तर आभार पद्माकर मांडवधरे यांनी मानले.









