मारेगाव | प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यातील चिंचोली बॉटनी सर्कल अंतर्गत येणाऱ्या ग्राम सराटी येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीविरोधात ग्रामस्थ महिला आक्रमक झाल्या असून त्यांनी थेट मारेगाव पोलीस स्टेशन गाठत कारवाईची मागणी केली आहे.
ग्राम सराटी येथील महिलांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देत गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याची तक्रार केली. या अवैध व्यवसायामुळे तरुण आणि लहान मुलेही दारूच्या आहारी जात असल्याची गंभीर बाब महिलांनी निवेदनात मांडली आहे.
तसेच दारूच्या नशेत महिलांशी गैरवर्तन, शिवीगाळ आणि घरगुती वादांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने महिलांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील शांतता आणि सामाजिक वातावरण धोक्यात येत असल्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे.
यावेळी महिलांनी नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक सागर दानडे यांच्याकडून ठोस आणि प्रभावी कारवाईची अपेक्षा व्यक्त केली. यापूर्वीही दानडे यांनी अशा प्रकरणांमध्ये कारवाई केल्याने ग्रामस्थांचा त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास असल्याचे नागरिकांनी सांगितले.
दरम्यान, ग्राम सराटीतील महिलांच्या या धाडसी पावलाचे परिसरात कौतुक होत असून, पोलिस प्रशासन आता कोणती कारवाई करते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
