लातूर | प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील एकूरगा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेस इयत्ता ९ वीची तुकडी मंजूर करण्यात आली असून, या निर्णयामुळे परिसरातील विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याने पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषद लातूरच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयाकडून यासंदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित करण्यात आला आहे. या आदेशानुसार एकूरगा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता ९ वीचा वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी दूरच्या ठिकाणी जावे लागणार नसून त्यांच्या वेळेची आणि खर्चाचीही बचत होणार आहे.
या मागणीसाठी Dhiraj Vilasrao Deshmukh यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्यांना गावातच दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी आणि शाळेच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने त्यांनी संबंधित विभागाशी समन्वय साधून हा प्रश्न मार्गी लावला.
इयत्ता ९ वीची तुकडी मंजूर झाल्यानंतर परिसरातील विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. याबद्दल ग्रामस्थांनी धिरज विलासराव देशमुख यांच्यासह Rahulkumar Meena, Trupti Andhare, जिल्हा परिषद सदस्य Dattatray Tekale, Ganesh Dhage, शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचे आभार मानले आहेत.
ग्रामस्थांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी धिरज देशमुख सातत्याने प्रयत्नशील असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक शैक्षणिक प्रश्न मार्गी लागत आहेत. एकूरगा जिल्हा परिषद शाळेस मिळालेली ही मंजुरी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही समाधान व्यक्त करत, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित प्रत्येक प्रश्नासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे सांगितले.
इयत्ता ९ वीची तुकडी मंजूर झाल्याने एकूरगा व परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अधिक चांगल्या संधी उपलब्ध होणार असून ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.





