तिलारी, प्रतिनिधी: झरे-२ येथील रस्ता गेल्या वर्षभरापासून बंद असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, आता ग्रामस्थांनी ३० जून २०२६ पासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. हे उपोषण सकाळी १० वाजल्यापासून ग्रामपंचायत झरे-२ कार्यालयासमोर सुरू करण्यात येणार आहे.
१५ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या रास्तारोको आंदोलनानंतर रस्ता खुला करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र वर्ष उलटूनही रस्ता पूर्ववत न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
निवेदनात पुनर्वसन क्षेत्रातील सुमारे २० गुंठे जमिनीची दुहेरी विक्री झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच झरे-२ परिसरातील अतिक्रमणांची तपासणी करून संबंधित जागा मोकळी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
काही व्यक्तींना विनाकारण अतिक्रमण प्रकरणात गोवण्यात येऊन आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागल्याचा आरोप करत नुकसानभरपाईची मागणीही करण्यात आली आहे.
मागण्यांवर तातडीने तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा जॉन फ्रान्सिस डिसोझा व केतन अँटोन डिसोझा यांनी दिला आहे.
