कन्नड : प्रतिनिधी
जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील मोठी स्वप्ने पूर्ण करू शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण कन्नड तालुक्यातील शिरोडी गावातील सुहास राजेंद्र इंगळे यांनी घालून दिले आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातील सुहास यांनी वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची आणि कठीण समजली जाणारी ‘एमबीबीएस’ (MBBS) ची अंतिम परीक्षा उत्तीर्ण करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सुहास यांचे वडील राजेंद्र इंगळे हे शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ग्रामीण भागातील मर्यादित सुविधा आणि आर्थिक अडचणी असूनही सुहास यांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न जिद्दीने जोपासले. सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि कुटुंबाच्या पाठिंब्याच्या जोरावर त्यांनी एमबीबीएस पदवी संपादन करत आपल्या कुटुंबाचे आणि गावाचे नाव उज्ज्वल केले.
सुहास यांच्या यशामुळे शिरोडी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थ, मित्रपरिवार, शिक्षक आणि नातेवाईकांकडून त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचे यश प्रेरणादायी ठरत असून “परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द असेल तर यश नक्की मिळते,” असा संदेश त्यांच्या यशातून मिळत आहे.
सुहास इंगळे यांच्या पुढील वैद्यकीय वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
