सेवाग्राम पोलीस स्टेशन पोलिसांनी मोटार चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावत 6 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव दिनेश राऊत (वय 22) यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनमध्ये अप. क्र. 272/2026 कलम 303 (2), बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीतील 09 सबमर्सिबल मशिन आणि 01 पाण्याची मोटार असा सुमारे 32 हजार रुपयांचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार खालील आरोपींना ताब्यात घेतले :
- सागर रामदास मानकर (रा. रुईखैरी, नागपूर)
- रामकृष्ण उर्फ गौरव प्रमोद हिवंज (रा. येसंबा, वर्धा)
- वैभव गणपत सोनटक्के (रा. बुट्टीबोरी, नागपूर)
- मयूर राजेश उईके (रा. हेटीवाही, हिंगणा)
सखोल चौकशीत आरोपींनी येसंबा व पुजई शिवारातून चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 09 सबमर्सिबल मोटारी, 01 पाण्याची मोटार, गुन्ह्यात वापरण्यात आलेली Mahindra Scorpio गाडी तसेच Honda Passion असा एकूण 6 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर, सपोनि रासकर, पोउपनि जगताप, बाबर्डे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि सायबर सेलच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या ही कामगिरी बजावली.
