चिंचणी | प्रतिनिधी
कडेगाव तालुक्यातील चिंचणी (अं.) येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास पास योजनेअंतर्गत सोनहिरा खोऱ्यातील ९५ विद्यार्थिनींना मोफत बस पासचे वितरण करण्यात आले. तसेच विद्यालयातील ३० विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरातील प्रवास पास देण्यात आले.
या उपक्रमामुळे आसद, सोनकिरे, सोनसळ, पाडळी, शिरसगाव, वाजेगाव, अंबक फाटा तसेच परिसरातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करण्यासाठी सुरक्षित, सुलभ आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारी प्रवास सुविधा उपलब्ध झाली आहे.
विद्यार्थ्यांना या योजनेचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी पलूस एस.टी. डेपोचे आगार प्रमुख कोळी साहेब, विटा एस.टी. डेपोचे आगार प्रमुख पवार साहेब, वाहतूक नियंत्रक सुनील पाटील, इनामदार साहेब तसेच कांबळे यांनी विशेष सहकार्य केले.
या उपक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. तृप्ती चिटणीस व पर्यवेक्षक डी. एन. कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. विभाग प्रमुख म्हणून राहुल कुंभार, व्ही. एस. काकडे आणि जी. व्ही. घुगे यांनी नियोजन व अंमलबजावणीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रवासाची चिंता कमी करणारी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरत असून, विद्यार्थी व पालकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.
