शेकापूर | प्रतिनिधी
गोर वसंतराव नाईक अभ्यासिका वर्ग, शेकापूर यांच्या वतीने नुकत्याच इयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले “भव्य करिअर मार्गदर्शन शिबिर” तसेच गावातील आदर्श शिक्षक मा. श्री. बंड सर यांच्या कन्या कु. अनुश्री ताई यांना जवाहर नवोदय विद्यालय, अकोला येथे प्रवेश मिळाल्याबद्दल आयोजित भव्य सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, सैन्यदल, अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्र तसेच उद्योग-व्यवसाय यांसारख्या विविध करिअर संधींबाबत सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करत यशस्वी भविष्यासाठी योग्य दिशा कशी निवडावी याविषयी प्रेरणादायी विचार मांडण्यात आले.
कु. अनुश्री ताई यांच्या यशाचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर मोठी स्वप्ने पूर्ण करू शकतात, याचे अनुश्री ताई हे प्रेरणादायी उदाहरण असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. श्री. शत्रुघ्न बंड सर, मा. श्री. नरेंद्र राठोड सर, मा. श्री. विश्वास राठोड (अन्न सुरक्षा अधिकारी), मा. श्री. विशाल उगले (महापारेषण विभाग) आणि मा. श्री. अविनाश राठोड (सेवाधारी) यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या उपक्रमाचे आयोजन श्री. अखिलेश शेषराव राठोड (सी.आर.पी.एफ.), श्री. विशाल उगले (महापारेषण विभाग) आणि श्री. अविनाश राठोड (सेवाधारी) यांनी केले होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट व्यवस्थापन जनसेवक श्री. मुकेश बाबुसिंग राठोड, अध्यक्ष – सेवा समूह शेकापूर यांनी सांभाळले.
यावेळी बोलताना जनसेवक श्री. मुकेश राठोड म्हणाले, “गावातील प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या समाजाचा भविष्यातील आधारस्तंभ आहे. योग्य दिशा, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या बळावर कोणतीही उंची गाठता येते. आजचा हा कार्यक्रम केवळ मार्गदर्शनाचा नसून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देण्याचा प्रयत्न आहे.”
कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक, नागरिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा कार्यक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवी दिशा आणि आत्मविश्वास मिळत असल्याची भावना व्यक्त केली.
प्रेरणादायी संदेश देताना मान्यवरांनी सांगितले की, “परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षण आणि मेहनत यांच्यासारखा दुसरा कोणताही शॉर्टकट नाही. स्वप्न पाहणारे अनेक असतात; पण त्या स्वप्नांसाठी संघर्ष करणारेच इतिहास घडवतात. शेकापूरच्या मातीतूनही अनेक अधिकारी, डॉक्टर, अभियंते, सैनिक आणि समाजसेवक घडू शकतात, फक्त गरज आहे ती स्वतःवर विश्वास ठेवण्याची.”
“योग्य दिशा, अथक परिश्रम आणि दृढ आत्मविश्वास यांच्या बळावर यश नक्कीच आपल्या पावलांशी येते,” असा सकारात्मक संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
