नांदेड : जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असतानाही अपेक्षित पावसाचा अभाव आणि वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. Rahul Kardile यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा व महाविद्यालयांचे वर्ग सोमवार, २२ जून २०२६ पासून सकाळी ८.०० ते दुपारी १२.३० या वेळेत भरविण्याचे निर्देश दिले आहेत.
या निर्णयामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. विशेषतः जिल्ह्यातील उष्णतेची तीव्रता आणि अनेक शाळांमधील अपुऱ्या सुविधा लक्षात घेता हा निर्णय दिलासादायक मानला जात आहे.
शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की मराठी, इंग्रजी, उर्दू, राज्य मंडळ, सीबीएसई आणि इतर सर्व मंडळांच्या शाळांनी या आदेशाची अंमलबजावणी करून पुढील आदेश येईपर्यंत सकाळच्या वेळेतच वर्ग भरवावेत.
दरम्यान, Indian Bahujan Teachers Association (इब्टा) महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने १० जून २०२६ रोजी प्रशासनाकडे निवेदन सादर केले होते. या निवेदनात जिल्ह्यातील वाढते तापमान, उकाडा, पाणीटंचाई तसेच अनेक शाळांमधील वीज व पंख्यांच्या अपुऱ्या सुविधा याकडे लक्ष वेधण्यात आले होते.
इब्टाचे केंद्रीय जिल्हाध्यक्ष बालासाहेब लोणे, जिल्हा सरचिटणीस निलेश गोधने, जिल्हा उपाध्यक्ष माधव कांबळे, विजय इंदूरकर, शेख अहमद आणि जिल्हा सहचिटणीस प्रकाश चांडोळकर यांनी विद्यार्थी व शिक्षकांच्या हितासाठी सकाळच्या सत्राची मागणी केली होती. प्रशासनाच्या या निर्णयामुळे त्या मागणीला यश मिळाल्याचे मानले जात आहे.
